बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 August 2019

बांगलादेशमधून बेकायदेशीर पद्धतीने भारतात आलेल्या महिलेस भिवंडी येथून अटक करण्यात आले आहे.

भिवंडी : भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी अटक केली. संबंधित महिलेचे नाव परवीन जमीरूल मियॉं (35) असे असून ती मूळची बांगलादेशातील जौसूर जिल्ह्यातील गोलताला या गावची रहिवासी आहे.

सदर महिलेने वर्षभरापूर्वी पश्‍चिम बंगालमध्ये बेकायदा प्रवेश केला. त्यानंतर तिने तेथील रहिवासी जमिरूल मियॉं याच्याशी लग्न केले. यानंतर महिनाभरापूर्वीपासून ती भिवंडीत येऊन राहत होती. दरम्यान, पती जमिरूल हा एका गुन्ह्यात जेलमध्ये असल्याने परवीन एकटीच राहत होती.

एक बांगलादेशी महिला नेहरूनगर भागात राहत असल्याची खबर भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांना मिळाली, त्यामुळे पोलिस पथकाने नेहरूनगर येथील चाळीवर छापा टाकून परवीन हीस ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत परवीन ही बांगलादेशी असून तिने भारतात चोरून प्रवेश केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

सध्या न्यायालीन कोठडी

परवीनला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या तिला कल्याणच्या आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi woman arrested for illegal living