
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात झळकले उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छांचे बॅनर
ठाणे - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. ठाण्यातून वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छांचे बॅनर लागतील का, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर ठाण्यात झळकल्यानंतर त्यापाठोपाठ कळव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातही शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत; मात्र त्यावर कोणाचेही नाव टाकण्यात आलेले दिसून आले नाही.
उद्धव ठाकरे आणि शिंदे हे आता वेगळे झाले आहेत. आमदारांसह खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांची शिवसेना आता कमी होताना दिसत आहे. अशातच दरवर्षी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यासह जिल्ह्यात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागत होते. यंदा मात्र त्याचे प्रमाण फारच नगण्य झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी ठाण्यातील जांभळी नाका परिसरात खासदार राजन विचारे यांनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी कळव्यातील विविध भागांत ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत; तर कोपरीत म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याच मतदारसंघात ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे. या बॅनरवर शिवसेना कोपरी विभाग एवढेच नाव शुभेच्छुक म्हणून देण्यात आले आहे; मात्र इतर कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांची नावे त्यात दिसून आलेली नाहीत. त्यामुळे ते बॅनर कोणी लावले याची चर्चा कोपरी भागात सुरू आहे.
Web Title: Banner Of Uddhav Thackerays Greetings Was Seen At Eknath Shindes Thana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..