
BBC Documentry: TISS प्रशासनानं डॉक्युमेंट्री दाखवली नाही पण विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर पाहिली
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात 'टीस'मध्ये बीबीसीनं तयार केलेली पंतप्रधान मोदींवरील डॉक्युमेंट्रीचं स्क्रिनिंग होणार असल्याचं इथल्या विद्यार्थ्यांकडून जाहीर करण्यात आलं होतं.
पण टीसच्या प्रशासनानं याला नकार दिला. त्यानुसार या डॉक्युमेंट्रीचं अधिकृत स्क्रीनिंग झालं नाही पण विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवरच ती पाहिली. (BBC Documentary TISS administration did not show but students screened it on laptop)
टीस प्रशासनानं डॉक्युमेंट्री पडद्यावर प्रदर्शित न करण्याची प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियनला विनंती केली. पण इथले विद्यार्थी डॉक्युमेंट्रीचं स्क्रिनिंग करण्यावर ठाम होते. त्यानुसार, त्यांनी पडद्यावर जर हा माहितीपट पाहता येत नसेल तर त्याला पर्याय म्हणून तो लॅपटॉपवर पाहण्याचं ठरवलं.
त्यानुसार त्यांनी संस्थेच्या सभागृहात एका खुर्चीवर लॅपटॉप ठेऊन त्यावर या माहितीपटाचं मास स्क्रिनिंग केलं. यामध्ये २०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी हा माहितीपट पाहिला. त्यानंतर या माहितीपटावर चर्चा देखील केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, टीसमध्ये हा माहितीपट प्रदर्शित करण्यात येऊ नये यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांनी यासंदर्भात निवेदन दिलं होतं तसेच हा माहितीपट प्रदर्शित होऊ नये असं पत्र दिलं होतं.