सावधान... तुमचा ई-पास बनावट असू शकतो

विक्रम गायकवाड
Sunday, 9 August 2020

नवी मुंबईतून आंतरजिल्हा व आंतरराज्यात जाण्यासाठी बनावट कागदपत्रे अपलोड करून ई-पास मिळवणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. या दोघांनी महिनाभरात 100हून अधिक नागरिकांना बनावट ई-पास दिल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतून आंतरजिल्हा व आंतरराज्यात जाण्यासाठी बनावट कागदपत्रे अपलोड करून ई-पास मिळवणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. या दोघांनी महिनाभरात 100हून अधिक नागरिकांना बनावट ई-पास दिल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. 

नवनाथ अगतराव दबडे (37) व ईश्वर प्रताप शिंदे (30) अशी दोघांची नावे आहेत. सध्या मुंबई व नवी मुंबईतून राज्यात अथवा इतर राज्यांत जाण्यासाठी पोलिस विभागाकडून ई-पास घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांना ई-पास कसा काढला जातो, याची माहिती नसल्याने नवनाथ व ईश्वर यांनी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ई-पास काढून देण्याबाबतची जाहिरात केली होती. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी इच्छुक असणारे नागरिक त्यांना संपर्क साधत होते. यासाठी त्यांच्याकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांचे आधार कार्ड घेत होते. 

अशी मिळणार रायगडकरांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवा

सरकारच्या लिंकवर माहिती अपलोड करताना आधार कार्डची पुढील बाजू त्‍याच व्यक्तीची तर मागील पत्त्याची बाजू ही नवी मुंबईतील व्यक्तीची असायची. त्यामुळे पोलिसांकडून ही व्यक्ती नवी मुंबईतील असल्याचे समजून ई-पास दिला जात होता. ही बाब नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई निरज दाभाडे यांना ऑनलाईन ई-पास मंजुरीचे काम करताना निदर्शनास आले. अधिक चौकशीत नवनाथने ही कागदपत्रे अपलोड केल्याचे आढळून आले. 

सिडकोच्या पणन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना फटका; विलंब शुल्काची आकारणी सुरूच

याबाबत गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कराड, राणी काळे, पोलिस उपनिरीक्षक अद्विती जुईकर आणि त्यांच्या पथकाने अधिक तपास करत नवनाथ व ईश्‍वर या दोघांविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. या दोघांना न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Alert from Fake e-pass... 2 peoples arrested in Navi Mumbai