
हवेची गुणवत्ता सुधारण्यात मुंबई देशातील अव्वल शहर ठरले आहे. मुंबईने आपल्या हवेच्या गुणवत्तेत सर्वाधिक 30 टक्के सुधारणा केली आहे
मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यात मुंबई देशातील अव्वल शहर ठरले आहे. मुंबईने आपल्या हवेच्या गुणवत्तेत सर्वाधिक 30 टक्के सुधारणा केली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. याशिवाय या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मुंबई हे सर्वाधिक आर्थिक मदत मिळवणारे शहरदेखील ठरले आहे. हवेचे प्रदूषण कमी करणाऱ्या देशभरातील एकूण शहरांमध्ये राज्यातील सहा शहरांचा समावेश आहे.
शहरांतील वाढते हवा प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 2018 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाचे आयोजन केले होते. प्रदूषण कमी करत हवेची गुणवत्ता 20 ते 30 टक्के सुधारण्याचे लक्ष्य यात ठेवण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सर्व राज्ये आणि प्रमुख शहरांनी सहभाग नोंदवला होता. हवेची गुणवत्ता सुधारणाऱ्या शहरांना केंद्राकडून 2,200 कोटींचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली होती. त्यानुसार शहरांना अनुदानाचे वाटपदेखील करण्यात आले. एकूण 15 राज्यांतील 42 शहरांची अनुदानासाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ही आर्थिक मदत देण्यात आली. राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानात राज्यातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि वसई-विरार या सहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील सात शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईत कोव्हॅक्सिनची अंतिम चाचणी सोमवारपासून सुरू; एक हजार लसी हैदराबादहून येणार
अनुदानाची राज्यनिहाय आकडेवारी
राज्य अनुदान (कोटीमध्ये)
1) महाराष्ट्र 396.5
2 तमिळनाडू 116.5
3) तेलंगण 117
4) उत्तर प्रदेश 357
5) प. बंगाल 209.5
6) आंध्र प्रदेश 67.5
7) बिहार 102
8) छत्तीसगड 53.5
9) गुजरात 202.5
10) हरयाना 24
11) झारखंड 79.5
12) कर्नाटक 139.5
13) मध्य प्रदेश 149.5
14) पंजाब 45
15) राजस्थान 140.5
............
सर्वाधिक अनुदान मिळवणारी शहरे
शहर आर्थिक मदत (कोटीमध्ये)
मुंबई 244
कोलकाता 192.5
बंगळर 139.5
हैद्राबाद 117
पटना 102
शहरांतील प्रदूषण कमी होत असेल तर ही निश्चितच चांगली बाब आहे; मात्र वाढत्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. मिळणाऱ्या अनुदानातून प्रदूषण कमी करणाऱ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रदूषण करणारे कारखाने, वाहने, दगडखाणी व इतर स्रोतांविरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
- भगवान केसभट,
संस्थापक, वातावरण फाऊंडेशन
best performance in improving air quality of mumbai
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )