"मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल पण तो भाजपचाच, बाळासाहेबांच्या संघर्षासाठी उभे राहू." - फडणवीस

सुमित बागुल
Wednesday, 18 November 2020

आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली

मुंबई : आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजपच्या मिशन मुंबईची  घोषणा करण्यात आली. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य फडणवीसांनी कार्यकारिणी बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधताना केलंय. फडणवीसांनी महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक मुद्द्यांवरून खडेबोल सुनावलेत. यामध्ये कोरोना, आरे मेट्रो, बुलेट ट्रेन , कोस्टल रॉड आदींचा समावेश होता. 

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :  

 • मुंबई भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांचे भाषण. नवीन टीमच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार याचा व्यक्त केला विश्वास. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचं मिशन मुंबई सुरु 
 • देशात कोरोनाच्या सर्वाधित केसेस महाराष्ट्र आणि मुंबईत का ? देशातील सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ४० टक्के लोकं महाराष्ट्रात का ? फडणवीसांचा सवाल 
 • मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाने मृत्यू झालेत. दुर्दैव म्हणजे कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरच लोणी या सरकारने खाल्लं.
 • कोरोनाबाबत जे स्वतःची पाठ थोपटून घेतायत त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 
 • कोरोनाकाळातील गैरव्यवहाराच्या सर्व बाबी मुंबईकरांच्या समोर आणू आणि आम्ही यांची लक्तर वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही. लवकरच आम्ही त्याची पुस्तिका तयार करणार आहोत. 
 • सर्व राज्यांनी कोरोनासाठी नागरिकांना पॅकेज दिलं, महाराष्ट्राने एका नव्या पैशाचे पॅकेज दिलं नाही 
 • वीजबिलांमध्ये सवलत देऊ असं सांगितलं, तीन पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत गेले, मात्र आज ऊर्जामंत्री म्हणालेत वीजबिलांचे पैसे भरावे लागतील, कुणालाही सवलत मिळणार नाही. ही थट्टा सुरु आहे, ठाकरे सरकार विश्वासघातकी सरकार आहे  
 • केंद्र सरकारने ९० हजार कोटींचे पॅकेज दिले होते. महाराष्ट्र सरकारने कर्ज का घेतलं नाही?  
 • सरकारने सावकाराप्रमाणे गरिबांची फसवणूक केली, ठाकरे सरकारने गरिबांचा कोणताही विचार केला नाही 
 • वीजबिल माफीच्या घोषणेवर सरकारने घुमजाव केलं, हा गरीबाशी केलेला विश्वासघात आहे , ही गरिबांची थट्टा आहे, 
 • बिहारच्या निवडणुकीत माझा खारीचा वाटा माझा आहे, मिळालेलं यश हे मोदींमुळे आहे. 
 • मुंबईचे २० वर्ष रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही सरकार असताना पूर्ण केले.
 • कोस्टल रोडचं काम गेली २० वर्षे रखडलेलं होत. आम्ही कायद्यात बदल करून घेतला आणि आता कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे. 
 • बीडीडी चाळीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो आम्ही पूर्ण केला.
 • धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा ८०० कोटींना ती जागा विकत घेतली. आता धारावी प्रोजेक्टला कोणीही रोखू शकत नाही.
 • नवी मुंबई विमानतळ तयार झाल्यामुळे मुंबईचा जीडीपी हा १% वाढणार आहे.
 • "इच्छा असेल तिथे मार्ग, टाइमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग"; आरेवरून ठाकरे सरकारला फडणवीसांचा टोला
 • आरे कारशेड करण्याचा निर्णय हा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. आमच्या सरकारने निर्णय केला आम्ही केवळ २५ एकर जागा घेऊ
 • कांजूरमार्गची जागा घेतली तर त्याची किंमत वाढेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासंदर्भात रिपोर्ट देखील देण्यात आला. मनोज सौनिक यांची समिती तयार करण्यात आली 
 • प्रकल्पाची किंमत याआधी २६०० कोटी होती आता ३९०० कोटी भरावे लागणार आहे
 • कांजूरमार्गला मेट्रो नेल्यामुळे सरकारला व्याज जास्त भराव लागेल.
 • मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट सरकार का लपवत आहे ?
 • बुलेट ट्रेन साठी एकट्या महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे 
 • लोकांना रोजगार मिळणार आहे, मात्र हे या सरकारला विकास विरोधी काम करायच आहे
 • पोलिसांच्या लाठ्या खाणे आणि अटक होणे हा आमचा डिएनए आहे.  आमचा संघर्ष आहे. वाटेल ते झालं तरी आम्हाला सरकार दाबू शकत नाही. इंदिरा गांधींना जे जमल नाही ते तुम्हांला जमणार आहे का ? 
 • पोलिसांना विनंती आहे कायद्यांने काम करा.सरकार आज आहे सरकार उद्या नाही. आमचंही सरकार येणार आहे
 • मी मुख्यमंत्री असताना माझ्याबद्दल माझ्या पत्नीबद्दल अनेकांनी ट्विट केले, आम्ही त्यांना अटक केली का ? 
 • अर्णब गोस्वामी यांना कशा प्रकारे फसविण्याचा प्रयत्न केला गेला. स्वत: अर्णब गोस्वामी माझ्या विरोधात बोलायचे आम्ही त्याला अटक केली का ?
 • किरिट्ट सोमय्या पुरावे देतात तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही त्यांना वाॅर्निग देता. “तुम्ही जर आमच्या अंगावर आलात तर खबरदार आम्ही सुद्धा तुम्हांला शिंगावर घेऊ”
 • राजाचा जीव पोपटामध्ये आणि यांचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे 
 • आम्ही मुंबई पालिकेत मागच्या वेळीस सत्ता बदलली असती. पण आम्ही संधी दिली. मित्र आहे म्हणून आम्ही पालिका सोडली.
 • ज्यांच्या डोक्यात सत्ता जाते त्याच पतन सुरू होते, यांचा माज आता दिसायला लागला आहे.
 • जनतेचा विचार करणारे लोक आता सत्तेवर आणावे लागतील.
 • २०२२ साली मुंबई महानगर पालिकेवर भगवाच फडकेल, पण तो भाजपाचा असेल.
 • आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही. मात्र आम्ही बाळासाहेबांच्या संघर्षासाठी उभे राहू. 

bharatiya janata partys mission mumbai starts read all pointers of aggressive speech of devendra fadanavis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharatiya janata partys mission mumbai starts read all pointers of aggressive speech of devendra fadanavis