भिवंडीतील २४ गावांची तहान भागणार; खदानीतून पाणीपुरवठ्याचा पर्याय | Bhivandi water supply update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapil patil

भिवंडीतील २४ गावांची तहान भागणार; खदानीतून पाणीपुरवठ्याचा पर्याय

भिवंडी : गावालगतच्या बंद पडलेल्या धोकादायक खदानी (Risky Mine) या ग्रामस्थांसाठी डोकेदुखीच असते. मात्र, या खदानीतील साचलेल्या पाण्यातूनच पाणीपुरवठा योजना (water supply scheme) साकारण्याचा पर्याय केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी सुचविला आहे. भिवंडी तालुक्यातील कालवार गावालगतच्या खदानीतून दररोज तब्बल ७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. त्यातून तब्बल २४ गावांची (villagers relief) तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पाटील यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई : प्रभाग पद्धतीबाबत भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे निर्देश

देशातील प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. त्याचबरोबर त्यांनी पाण्याचे नवे स्रोतही शोधण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पंतप्रधान योजना अंतर्गत विविध योजना ठाणे जिल्ह्यात राबविण्यासाठी भिवंडी तालुक्यातील कालवार येथील दगड खदानीतील प्रचंड पाणीसाठ्याची माहिती घेऊन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेला पाहणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कालवार येथील खदानीतून दररोज ७ दशलक्ष पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. आडे यांनी व्यक्त केला आहे.

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायतराज मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली होती. त्यात खदानीतील साचलेल्या पाण्याबाबतही चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कालवार येथील खदानींची पाहणी केली. या वेळी स्टेमचे महाव्यवस्थापक संकेत घरत, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. आडे यांच्यासह विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा उभारण्याची सूचना

कालवार येथील खदानीतून ७ दशलक्ष लिटर पाणी साकारल्यास, भिवंडी तालुक्यातील ३४ पैकी २४ गावांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना साकारता येईल; तर स्टेमकडून सध्या होणारा पाणीपुरवठा उर्वरित गावांमध्ये वळविता येणार आहे. पाणी शुद्धीकरण व पुरवठा करण्यासाठी स्टेम व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी सुचना कपिल पाटील यांनी केली. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील पाये गाव-ब्राह्मण पाडा येथील खदानीतील पाण्याचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भिवंडीतील ३४ गावांना जादा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top