संग्रहित
संग्रहित

कोट्यवधींची मासळी पाण्यात

मुंबई  : तालुक्‍यातील रेवस- बोडणी येथील सुमारे 200 हून अधिक मच्छीमार नौकांनी वादळात भरकटल्यानंतर जयगड बंदराचा आधार घेतला होता; परंतु तेथील मच्छी व्यापाऱ्यांनी मासळी उतरविण्यास विरोध केल्याने अलिबाग येथील मच्छीमारांचे सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही मासळी परत अलिबाग येथे आणणे शक्‍य नसल्याने ती फेकून द्यावी लागली. जयगड येथील मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या विरोधाबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे दाद मागण्यात येणार आहे. 

रेवस - बोडणी येथील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसंदर्भात सरकारने योग्य ती दखल घ्यावी, अशी येथील मच्छीमारांची मागणी आहे. 1 ऑगस्टला मासेमारी करण्याचे अधिकृत बंदी आदेश उठल्यानंतर रायगड, मुंबईमधील सुमारे 200 ते 250 बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. मात्र हवामान खराब असल्यामुळे अचानक वादळ सुरू झाले. त्यामुळे सर्व बोटी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरात आश्रयासाठी गेल्या होत्या. त्यानंतर हवामान अधिक खराब झाल्याने सर्व मच्छीमारांनी बोटीतील मासळी खराब होऊ नये, म्हणून तेथील बंदरावर उतरविण्यास परवानगी मिळाली असता तेथील स्थानिकांनी विरोध दर्शविला.

आम्ही प्रशासनाकडे मदत मागितली असता त्यांनीसुद्धा आम्हाला मदत केली नाही. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत मागितली असता त्यांच्याकडूनही योग्य ते सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे खराब झालेली मासळी समुद्रात टाकावी लागली. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, त्यासाठी जिल्हाधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग रायगड, मत्स्यव्यवसाय आयुक्त-तारापूर तसेच मत्स्यव्यवसाय मंत्रालय यांना पत्रव्यवहार करीत आहे, अशी माहिती मल्हारी मार्तंड रेवस बोडणी मच्छीमार सह. संस्थेचे चेअरमन विश्‍वास नाखवा यांनी दिली. 

मासेमारी नौकांची ज्या बंदरात नोंदणी झालेली असेल, त्याच बंदरात मासळी उतरविण्याची परवनागी आहे, असा नियम आहे. त्यामुळे अलिबागच्या मच्छीमारांना ससून डॉकमध्ये मासळी उतरविण्यासाठी अडचण येत असते. याच नियमावर बोट ठेवून रत्नागिरीतील मच्छामारांनीही हरकत घेतली असावी. यासंदर्भात मच्छीमारांचे किती नुकसान झाले असावे, याची माहिती घेतली जाईल. 
- अभयसिंह शिंदे-इनामदार, मत्स्यव्यवसाय उपायुक्त, रायगड 

समुद्रामध्ये मासेमारी करताना अनेक वेळा बोटी भरकटतात. अनेक वेळा जवळच्या बंदराचा आधार घ्यावा लागतो. या वेळी आणलेली मासळी उतरावी लागते; परंतु तेथील स्थानिक मच्छीमार मासळी उतरविण्यासाठी नकार देत असल्याने नुकसान होते. या नियमामध्ये बदल होणे आवश्‍यक आहे. 
- सागर बंदरी, मच्छीमार, आवास 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com