अंध बिबट्या दत्तक घेत साजरा केला वाढदिवस! जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या कन्येचा पुढाकार

मिलिंद तांबे
Wednesday, 2 December 2020

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची कन्या कुवेदांगी बोरीकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक मादी बिबट्या दत्तक घेत आपला वाढदिवस साजरा केला.

मुंबई : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची कन्या कुवेदांगी बोरीकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक मादी बिबट्या दत्तक घेत आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे "कोयना' नावाची ही नऊ वर्षीय मादी बिबट्या अंध आहे. दोन्ही डोळ्यांना दुखापत झाल्याने 2012 मध्ये तिला कोयना अभयारण्यातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट निवारा केंद्रात दाखल केले होते. 

हेही वाचा - कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; गरोदर महिलेची प्रकृती चिंताजनक 

बोरीकर कुटुंबाने सलग दुसऱ्या वर्षी "कोयना'ला दत्तक घेतले आहे. मिलिंद बोरीकर यांनी नुकतीच सहकुटुंब उद्यानातील प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन वन्यप्राणी दतक योजनेचा धनादेश राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जुन यांना हस्तांतरित केला. 
जगातील मोजकी महानगरे आणि दाट लोकवस्तीजवळ असलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई व ठाणे महानगरांच्या मध्ये वसलेले आहे. या उद्यानातील वन्यप्राणी व समृद्ध जैवविविधतेमुळे परिसरातील लोकांना अनेक फायदे मिळतात. त्यामुळे या उद्यानाचे संरक्षण-संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून उद्यानातील वन्यप्राण्यांचे पालकत्व स्वीकारून हातभार लावला, असे बोरीकर यांनी या वेळी सांगितले. 

हेही वाचा - जलयुक्त शिवार चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी निर्धारित दत्तक मूल्य स्वीकारून एका वर्षासाठी दत्तक घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार सिंह 3 लाख, वाघ 3.10 लाख, बिबट 1.20 लाख, वाघाटी 50 हजार, नीलगाय 30 हजार, चितळ 20 हजार दतकमूल्य आहे. उद्यानातील वाघ, सिंह आणि इतर प्राणी अद्याप दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी तसेच संस्था, खासगी कंपनी यांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जी. मल्लिकार्जुन यांनी केले. 
Birthday celebrated by adopting blind leopard Initiative of the daughter of Collector Milind Borikar

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday celebrated by adopting blind leopard Initiative of the daughter of Collector Milind Borikar