'राममंदिर निर्माण कामात सहभागी व्हा'; भाजप नेत्याचा महापौर पेडणेकरांना टोला

कृष्ण जोशी
Saturday, 23 January 2021

राममंदिर निर्माण कामासाठी मालाड-मालवणीमध्ये लावलेले निधी संकलनाचे फलक BMCने उतरविल्यामुळे भाजपने संताप व्यक्त केला

मुंबई  ः राममंदिर निर्माण कामासाठी मालाड-मालवणीमध्ये लावलेले निधी संकलनाचे फलक उतरविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा निषेध करतानाच महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही राममंदिर उभारणीच्या कामात सहभागी व्हावे, असा टोला भाजप नेत्यांनी लगावला आहे. 

राममंदिर उभारण्यासाठी साऱ्या देशभर निधी संकलनाचे काम महिनाभर सुरू राहणार आहे. मालवणीत लावलेले याची माहिती देणारे फलक महापालिका कर्मचाऱ्यांनी उतरवले होते, तसेच पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल केले होते. याविरोधात आज भाजप नेत्यांनी मालवणी पोलिस ठाण्यासमोर जमून निषेध केला. या वेळी त्यांनी पोलिसांनी निषेधाचे पत्रही दिले. काही अज्ञात व्यक्तींनी हे फलक फाडल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. त्यामुळे तेथे वादंग झाल्यावर उलट पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याचा त्यांनी या वेळी निषेध केला. 
राममंदिर निर्माणासाठी निधी संकलन साऱ्या देशातच सुरू आहे. मग मालवणी विभाग काय पाकिस्तानात आहे का, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. इथले फलक उतरविण्यात आले. तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, हे योग्य नाही. पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली. मालवणीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय मिळतो, येथे प्रचंड प्रमाणात सरकारी जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. तिवरांच्या जंगलांवर अनधिकृत स्टुडिओ उभे रहात आहेत. हे प्रकार करणाऱ्या देशविघातक शक्तींविरुद्ध पोलिसांनी राजकीय दडपण झुगारून कारवाई करावी, असेही दरेकर यांनी सांगितले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महापौरांना पत्र 
राममंदिर निर्माण कामात सहभागी व्हावे, असे पत्रच भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या महापौरांना दिले आहे. अयोध्येतील राममंदिराबाबत बाळासाहेब ठाकरे यांना विशेष आस्था होती, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या कामासाठी शिवसेनेच्या वतीने मोठा निधी दिला आहे. मुंबईत राममंदिराचे फलक पालिका कर्मचारी काढत असून, त्यामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे यासंदर्भात पालिका आयुक्तांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंतीही या पत्रात केली आहे.

BJP angry over Ram Mandir fund board Removal protest in front of Malvani police station

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP angry over Ram Mandir fund board Removal protest in front of Malvani police station