भाजपच्या घोषणेत ना देवेंद्र, ना नरेंद्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

"शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार' ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे. 

मुंबई : "छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ' ही घोषणा देऊन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. त्यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी "शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार' ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे. 

2014 मध्ये शिवसेना-भाजपची दोन दशकांहून अधिक जुनी युती तुटली. युती तुटल्यावरच भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन शिवसेनेला शह दिला होता. शिवाजी महाराजांना सर्वप्रथम शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकरणात आणले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा ती शिवशाही असल्याचा उल्लेख वारंवार शिवसेनेकडून केला जात होता. तसेच विधानसभेवर भगवा फडकवण्याचे आवाहनही केले जाते; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शाहू, फुले, आंबेडकर यांचा नेहमीच उल्लेख केला जातो. 

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राज्यात दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा मुख्यमंत्री बनण्याच्या स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा हसण्यावारी नेली होती; मात्र प्रत्यक्षात घोषणा खरी ठरली. निवडणूक जिंकल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, त्यांच्या नावाचा उल्लेख भाजपच्या घोषणेत राहणार नाही; तर यंदाही भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच निवडणूक लढवणार आहे. या वेळी तर भाजपने पंतप्रधान मोदी यांच्याही नावाचा समावेश केलेला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the BJP announcement, neither Devendra nor Narendra