ठाकरे सरकार मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकलणार, भाजपचा आरोप

ठाकरे सरकार मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकलणार, भाजपचा आरोप

मुंबई:  महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारामूळेच बीडीडी चाळ आणि धारावीचा विकास रखडला आहे. आपल्या मर्जीतील बिल्डरच्या फायद्यासाठी येथील मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकलण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. 

आपल्या मर्जीतील बिल्डरना धारावी आणि बीडीडीची कामे मिळावीत म्हणून या कामात ठाकरे सरकार मुद्दाम दिरंगाई करीत असल्याचा गंभीर आरोपही भातखळकर यांनी केला. केवळ हे प्रकल्प फडणवीस सरकारने सुरु केले असल्याने ठाकरे सरकार त्यात खोडा घालत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

अनेक दशकांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच परिसरात घर मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. म्हाडामार्फत बीडीडी चाळीचा पुनर्विकास होणार असल्याने बीडीडी चाळीतील प्रत्येक कुटुंबाला सुमारे 500 चौरस फुटांचे घर वरळी आणि नायगाव परिसरात मिळणार होते. मात्र आपल्या 'आवडीच्या' बिल्डरला हे काम मिळावे यासाठी मागील वर्षभरापासून ठाकरे सरकारकडून प्रकल्प सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. अशा प्रकारे बीडीडी चाळीतील मराठी माणसाला मुंबईबाहेर पाठविण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. 

सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बिल्डरांसोबत 'अर्थपूर्ण संवाद' करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना बीडीडी चाळीतील भाडेकरूंना घरे वितरित करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. मंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण पुढे करत मागील वर्षभरात तीन वेळा वितरण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यातून सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला मागील वर्षभरापासून सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा काम करण्यास असमर्थता दाखविल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले.

एकीकडे बीडीडी चाळीची ही अवस्था असताना दुसरीकडे धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्नसुद्धा जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला जात आहे. पूर्वीची निविदा रद्द करून नवीन निविदा काढली जाणार असल्याचे घोषित करून कित्येक महिने उलटून गेले. तरीही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळावे याकरिता मनोरा आमदार निवासाचे काम सुद्धा थातूरमातूर कारण देत नामांकित सरकारी कंपनीकडून काढून घेण्यात आले. केवळ देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेले हे प्रकल्प होते म्हणून हे महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीने कामे रखडवीत आहे. असे असल्यास त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मराठी माणसाच्या हक्काकरिता आणि बीडीडी चाळ, धारावीतील लाखो कुटुंबांसाठी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

तसेच, केवळ वेळ नाही म्हणून मागील वर्षभरापासून घरांचे वितरण रखडवणाऱ्या सरकारने पुढील सात दिवसांत बीडीडीच्या भाडेकरूंना घरे वितरित न केल्यास भारतीय जनता पक्षाकडून गृहनिर्माण मंत्र्यांच्या घरालाच घेराव घालण्यात येईल, असेही भातखळकर यांनी सांगितले आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP Atul Bhatkhalkar criticized thackeray government BDD Chawl Dharavi redevelopment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com