esakal | "आपल्याला झेपतील आणि समजतील अशीच ट्विट करा"

बोलून बातमी शोधा

Aaditya-Thackeray

भाजपच्या दोन नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर केली सडकून टीका; संजय राऊतांची मात्र सावध भूमिका

"आपल्याला झेपतील आणि समजतील अशीच ट्विट करा"

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी एक ट्वीट केलं. 'महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ पर्याय म्हणून नव्हे तर राज्य सरकारचं कर्तव्य म्हणून घेण्यात आला आहे. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे', असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. पण काही काळाने ते ट्वीट डिलीट करण्यात आलं. लोकांमध्ये लसीकरण मोहिमेबद्दल शंका उत्पन्न होऊ नये म्हणून हे ट्वीट डिलीट केल्याचं त्यांनी सांगितलं. ट्वीट डिलीट केल्यानंतर भाजपच्या अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

मोफत लसीकरणाबद्दल ट्वीट करणाऱ्या आदित्य ठाकरेंना उद्देशून अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं. "आपल्याला झेपतील आणि समजतील अशाच विषयावर ट्विट केले, तर ते डिलीट करण्याची नामुष्की ओढवत नाही आदित्यजी...", अशी टोला त्यांनी केली. तसेच, "लसीकरणाऐवजी नाईट लाईफ, बार अँड रेस्टॉरंट, पेंग्विन अशा आपल्याला गती असलेल्या विषयावरच ट्विट करावे", असा खोचक सल्लाही त्यांनी आदित्य यांना दिला.

img

आदित्य ठाकरेंनी डिलीट केलेल्या स्क्रीनशॉटचा फोटो पोस्ट करत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही त्यांच्यावर टीका केली. "बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात. ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी जाहीर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा’ ‘निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा", असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊतांची सावध भूमिका...

"आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केलं, त्या मुद्द्यावर मी बोलणार नाही. हा सरकारचा विषय आहे. सरकार या बद्दलचा योग्य तो निर्णय घेईल. जर विरोधकांकडून या बद्दल काही सूचना करण्यात आल्या असतील तर त्यावरही नक्कीच विचार केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात अनेक निर्णय घेतले आहेत. आदित्य ठाकरे हेदेखील कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय हे कायम राजकारण बाजूला ठेवूनच घेतले जातात. ठाकरे सरकारला संकटाचा संधी म्हणून वापर करून त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. हे सरकार प्रत्येक पाऊल नागरिकांचा जीव वाचावा म्हणून टाकत आहे. त्यामुळे लसीकरणाचा जो निर्णय होईल त्याबद्दल सरकारमधील प्रमुख मंत्री स्वत: निर्णय जाहीर करतील", अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंबद्दलच्या प्रश्नावर सावध भूमिका घेतली.