वीज बिलात सवलत न दिल्यास तीन दिवसांनी मंत्रालयात शिरणार, भाजपचा सरकारला अल्टिमेटम

कृष्ण जोशी
Friday, 20 November 2020

लॉकडाऊनकाळातील जादा वीज बिलांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना तीन दिवसात बिलांमध्ये सवलत न दिल्यास मंत्रालयात शिरून आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई, ता. 20 : लॉकडाऊनकाळातील जादा वीज बिलांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना तीन दिवसात बिलांमध्ये सवलत न दिल्यास मंत्रालयात शिरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिला आहे. 

राज्य वीज मंडळाच्या गोंधळामुळे वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळात भरमसाठ बिले आली होती. या जादा बिलांपैकी निदान छोट्या ग्राहकांना तरी सवलत द्यावी, अशी भाजपची मागणी होती. बिलांमध्ये सवलत देण्याचे प्रथम सरकारने जाहीर केले होते. मात्र अर्थखात्याने आक्षेप घेतल्यामुळे आता अशी सवलत मिळणार नाही, ग्राहकांनी संपूर्ण विजबिले भरावीत, असे नुकतेच उर्जामंत्र्यांनी जाहीर केले होते. 

 

महत्त्वाची बातमी : पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

या फसवणुकीविरोधात आता भाजपने रणशिंग फुंकले असून याप्रकरणी विविध मार्गांनी आंदोलने करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सोमवारपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. सरकारने केलेल्या या फसवणुकीच्या निषेधार्थ आज भाजपच्या मुंबई महिला आघाडीतर्फे वीज मंडळाचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगडावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार मनीषा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई आदी हजर होत्या. त्यावेळी मोर्चासमोर बोलताना भातखळकर यांनी सरकारला वरीलप्रमाणे अंतिम इशारा दिला. 

महत्त्वाची बातमी  ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात बेबनाव असल्यानेच वीजग्राहकांना सवलत मिळाली नाही, असे भातखळकर यांनी दाखवून दिले. राज्याच्या उर्जामंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे ही सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. जोपर्यंत राज्यातील जनतेला 300 युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही भातखळकर यांनी दिला. कोरोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बील देणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता 'शॉक' दिल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

( संपादन - सुमित बागुल )

bjp gives three days ultimatum to state government to give concession on electricity bill


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp gives three days ultimatum to state government to give concession on electricity bill