केडीएमसीत भाजपचा शिवसेनेला झटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

राज्यात सत्तास्थापनेसाठी नव्याने स्थापन झालेली "महाविकास आघाडी' राज्यातल्या बहुतेक शहरांमध्ये यशस्वी होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत या आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. आज झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या विकास म्हात्रे यांनी अनपेक्षित विजय मिळवत शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

कल्याण : राज्यात सत्तास्थापनेसाठी नव्याने स्थापन झालेली "महाविकास आघाडी' राज्यातल्या बहुतेक शहरांमध्ये यशस्वी होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत या आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. आज झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या विकास म्हात्रे यांनी अनपेक्षित विजय मिळवत शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

सेनेचे सदस्य वामन म्हात्रे गैरहजर राहिल्याने सेना उमेदवार गणेश कोट यांना सात मते मिळाली. तर भाजप उमेदवार विकास म्हात्रे यांना त्यांच्या पक्षाची सहा, तर कॉंग्रेस आणि मनसे यांची प्रत्येकी एक-एक मत मिळाल्याने सभापतिपदी भाजप उमेदवाराचा विजय झाला. तर दुसरीकडे महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी शिवसेनेच्या वीणा जाधव विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत एकच उमेदवारी अर्ज दाखल होता. 

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्‍चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, पालिकेतील सेनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक गोपनीय पद्धतीने झाल्यामुळे बाहेर असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच वेळी गोपाळ लांडगे यांच्यासह आमदार भोईर आणि इतर पदाधिकारी निघून गेल्यामुळे विकास म्हात्रे यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांचे स्वागत केले. तसेच भाजप कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भाजपचा विजय साजरा केला. 

2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागांचे वाटप करण्यात आले होते. याच पद्धतीने पाचव्या वर्षी स्थायी समिती सभापतिपद भाजपला देण्याचे ठरले होते. मात्र वारंवार संपर्क करूनही शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील नेतृत्त्वाने त्याकडे लक्ष न दिल्याने अखेर भाजपला विजयासाठी प्रयत्न करावे लागले, असे डोंबिवलीचे आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणामुळे ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका येथे शिवसेनेने भाजपचा कोणताही विचार केला नसल्याबद्दल चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. 

आजच्या निवडणुकीसाठी पक्षाने सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता. आमच्या पक्षाचे सदस्य वामन म्हात्रे प्रत्यक्षात उपस्थित न राहिल्याने त्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले आहे. पक्षशिस्तीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जे आरोप केले आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. 
- गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिवसेना-कल्याण 

सत्तेसाठी राजकीय समीकरणे आणि गणिते बदलत असल्याचे गेल्या काही काळात सर्वांनीच पाहिले आहे. अशाच प्रकारचे नवीन समीकरण पालिकेत आज झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाले. मनसेने आपल्या सदस्यासाठी कोणताही आदेश दिला नव्हता. भाजप उमेदवाराला मत देऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. 
- मंदार हळबे, गटनेता, मनसे 

कॉंग्रेस नगरसेवकांवर कारवाई! 
राज्यभरात महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसोबत राहणार असल्याने कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार मी जिल्हाध्यक्ष या नात्याने गटनेता नंदू म्हात्रे, हर्षदा भोईर यांना व्हीप बजावून सेना उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश द्यावेत असे सांगितले होते. परंतु या आदेशाचे पालन न झाल्याने हर्षदा भोईर यांनी वैयक्तिक पातळीवर निर्णय घेऊन भाजप उमेदवाराला मतदान केले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी कारवाई पक्षाकडे प्रस्तावित केली आहे. गटनेता नंदू म्हात्रे यांच्यावरही शिस्तभंग कारवाई केली जावी असे प्रदेशाध्यक्षांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP hits Shiv Sena in KDMC