esakal | "केंद्राच्या नावाने कांगावा अन् नुसताच शब्दांचा फुलोरा"

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपचं सरकारवर टीकास्त्र

"केंद्राच्या नावाने कांगावा अन् नुसताच शब्दांचा फुलोरा"
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री जनतेशी लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील कोरोनाची स्थिती, लॉकडाउनची गरज, वैद्यकीय सेवांची सद्यस्थिती तसेच लसीकरणासाठी उत्सुक असलेला नवा वर्ग या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे भाषण हे निव्वळ भुलभुलय्या असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. "कालचे मुखमंत्र्याचे भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या... ना कोणती उत्तरं, ना कोणती दिशा. १२ कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? पाच लाख लसी महाराष्ट्रात दिल्याच नाहीत, मग तरी त्याची घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का तो कूछ पता नहीं हे या राज्य सरकारचं वैशिष्ट्य आहे", अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

"मदत होत आहे, कामे केली जात आहेत, अशी सगळी भाषा या फेसबुक लाईव्हमध्ये होती. पण राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली? त्यांची यादी, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नावनोंदणी केली की त्याला लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे. १२ कोटी लसी देण्यासाठी एक रकमी चेक देणारे इथल्या डॉक्टर, नर्सेंस, आरोग्य सेवात काम करणाऱ्यांच्या समस्यांकडे मात्र लक्ष देत नाहीत", असं ट्वीट त्यांनी केलं.

"१५ दिवस कडक निर्बंध वाढवताना काही ठोस माहिती घेऊन येतील असे वाटलं होते. सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणारे मुख्यमंत्री त्याची तयारी मात्र काहीच न करता केवळ 'हे सुरू ते सुरू' अशी गोल गोल उत्तरं देतात. रिक्षाचालकांना मदतीची जी घोषणा केली होती, ती रक्कम देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेमडेसीवर व ऑक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते. मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात, हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये", असा इशाराही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.