esakal | मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja

मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि समर्थक नाराज असल्याची जोरजार चर्चा सुरु आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यातच त्यांनी दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना अधिक जोर चढला आहे. मुंबईत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक मुंबईत आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केले आहेत.

मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील तळागाळातील माणूस राजकारणात यायला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी सर्वसामान्यांना मंच उपलब्ध करुन दिला. आपल्या हाडामासाचा माणूस लोकांमध्ये उतरला पाहिजे, लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला राजकारणात आणलं. त्यामुळे माझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा, बहिणीला मंत्री करा, नवऱ्याला मंत्री करा असा नाही. माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

वडील जिवंत असतानाच मी राजकारणात आले. लोकांना मुंडे साहेबांविषयी प्रचंड प्रेम होते. मुंडे साहेबांना दिलेली सत्ता सामान्य लोकांना दिलेली सत्ता होती. ही सत्ता नियतीने खेचून घेतली, ही सत्ता मी खेचून आणून मी लोकांच्या पायाशी अर्पण केल्याशीवाय राहणार नाही, असं मी त्यावेळी संघर्ष यात्रेमध्ये म्हणाले होते. मी कधीच मुंडे साहेबांना वारसा असल्याचं म्हटलं नाही. मागे मी केंद्रातील मंत्रिपद नाकारलं होतं. आज मी मंत्रिपदासाठी कशी नाराज असेल? आज कार्यकत्यांना मी राजीनामा देऊ देणार नाही. मी लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही. मला खूर्ची नको. मी असुरक्षित नाही. कुणाला नष्ट करुन मला मंत्री व्हायची नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना राजीनामा देऊ देणार नाही, असं पंकजा म्हणाल्या.

loading image