esakal | कंपाऊंडरऐवजी डॉक्टरकडून औषधे घ्या वैफल्यग्रस्त मनस्थिती ठीक करा, भाजपचा राऊतांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

कंपाऊंडरऐवजी डॉक्टरकडून औषधे घ्या वैफल्यग्रस्त मनस्थिती ठीक करा, भाजपचा राऊतांना टोला

कंपाऊंडरऐवजी एमडी डॉक्टरकडून औषधे घेऊन आपली मनस्थिती ठीक करावी, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज लगावला. 

कंपाऊंडरऐवजी डॉक्टरकडून औषधे घ्या वैफल्यग्रस्त मनस्थिती ठीक करा, भाजपचा राऊतांना टोला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज वैफल्यतेतून अनेक सवंग विधाने केली आहेत. त्यांनी कंपाऊंडरऐवजी एमडी डॉक्टरकडून औषधे घेऊन आपली मनस्थिती ठीक करावी, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज लगावला. 

राऊत यांच्या पत्नीला काल पीएमसी बँक प्रकरणी ईडीची नोटिस आल्यानंतर राऊत यांनी आज पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. त्याचा समाचार घेताना ही पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण, केवळ तोंडच्या वाफा, असा टोमणा भातखळकर यांनी मारला. 

मुळात कर नाही त्याला डर असायचे काहीच कारण नाही. राऊत यांनी पुरावे द्यावेत आणि ईडीच्या नोटिशीला समर्पक उत्तरे द्यावीत. विनाकारण भाजपवर हेत्वारोप करण्याचे धंदे बंद करावेत, असेही भातखळकर यांनी त्यांना सुनावले. 

राऊत यांनी आज वैफल्यातून अनेक सवंग विधाने केली आहेत. ते आतापर्यंत कंपाऊंडरकडून औषधे घेत आहेत, त्याऐवजी त्यांनी एमडी डॉक्टरकडून औषधे घ्यावीत म्हणजे त्यांची मनस्थिती ठीक होईल, असाही टोला भातखळकर यांनी लगावला. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आपण तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील, असा इशारा राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. त्याचा प्रत्युत्तर देताना, तुमचे तोंड कोणी दाबले आहे, तोंड उघडा आणि जे मनात येईल ते बोला, असे भातखळकर म्हणाले. तुमच्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही, कारण कर नाही त्याला डर असण्याचे कारणच नाही, असेही ते म्हणाले. 

संजय राऊत मुद्दा टाळताहेत
 
तर राऊत कुटुंबियांना पीएमसी बँक प्रकरणातून 55 लाख रुपये मिळाले का, एचडीआयएल बरोबर किंवा प्रवीण राऊत यांच्याबरोबर त्यांचे संबंध काय आहेत, या प्रश्नाची उत्तरे संजय राऊत यांनी द्यावीत, असे आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून हे प्रश्न विचारले आहेत. 

हेही वाचा-  काँग्रेस पक्ष पुन्हा दिमाखाने उभारी घेईल: बाळासाहेब थोरात

माधुरी आणि प्रवीण राऊत यांना एचडीआयएल कडून पैसे मिळाले होते, ते नंतर वर्षा संजय राऊत यांना देण्यात आले, असा आरोपही सोमय्या यांनी केला. हे मिळालेले पैसे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना राऊत परत करतील का, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. या पैशांचा जाब तुम्हाला द्यावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bjp mla Atul Bhatkhalkar criticized shivsena mp Sanjay Raut ed notice

loading image