esakal | भाजपकडून शरद पवारांचे आभार तर नव्या गृहमंत्र्यांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant-patil-sharad-pawar-smile

वाचा नक्की काय आहे प्रकरण

भाजपकडून शरद पवारांचे आभार तर नव्या गृहमंत्र्यांना इशारा

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या अनेक प्रकरणं गाजत आहेत. अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण, परमबीर लेटरबॉम्ब प्रकरण हे सारं ताजं असतानाच सचिन वाझेने बुधवारी NIAला एक पत्र दिलं. त्यात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. तर राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसाबद्दल राजकारण सुरू आहे. केंद्राकडून लसीचा साठा महाराष्ट्राच्या वाट्याला कमी येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या मते महाराष्ट्रातवर कोणताही अन्याय केला जात नाहीये. या मुद्द्यावर गुरूवारी शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. केंद्र सरकार लसीच्याबाबतीत राजकारण करत नसून ते स्वत: या मुद्द्यात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितलं. यावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे आभार मानले. "शरद पवार यांनी केंद्र सरकारबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे केंद्राची पाठराखणच आहे. मी त्यांच्या मताशी सहमत असून केंद्राची भूमिका त्यांनी समजावून सांगितल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

वळसे पाटलांना इशारा

वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताना काही महत्त्वाची वक्तव्यं केली. त्यावरून चंद्रकांत दादांनी त्यांना इशारा दिला. "रा स्व संघ ही दहशतवादी संघटना नाही. दिलीप वळसे पाटील हे जबाबदार गृहमंत्री आहेत. राष्ट्रपती राजवटीची भाजपाची मागणी नाही. वळसे पाटील यांनी प्रकरणांची नीट चौकशी करून माहिती काढावी. पण तुमच्या वादात संघाला दोष देऊ नये", असा इशारा त्यांनी नव्या गृहमंत्र्यांना दिला.

loading image