"रायगड पॅटर्न'वर महाविकासआघाडीला होमवर्क करण्याची वेळ? भाजपची निवडणूकांमध्ये मुसंडी

महेंद्र दुसार
Wednesday, 20 January 2021

रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना "रायगड पॅटर्न'वर होमवर्क करण्याची वेळ आली आहे. 

रायगड जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आटोकाट प्रयत्न केला. तरीही पनवेल, उरण, रोहा तालुक्‍यात भाजपाने प्रभाव दाखवलाच. 78 पैकी 12 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. एकेकाळी रायगडमध्ये अस्तित्व नसलेल्या या पक्षाचे स्थानिक पातळीवर हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाचा धोका खासदार सुनील तटकरे यांनी एक वर्षापूर्वीच ओळखला होता. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजप हातपाय पसरत आहे, त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षाने एकत्र येत विरोध करायचा आणि भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष समजून निवडणुका लढवायच्या असे ठरले होते. त्यानुसार मोर्चेबांधणीही झाली होती. 

मुंबई, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कार्यकर्त्यांचे अंतर्गत पक्षप्रवेश बंद करावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मागील एक वर्षात असे जाहीर पक्षप्रवेश झालेले नाहीत, परंतु भाजपने अंतर्गत कच्चे दुवे शोधत स्थानिक पातळीवर सुरू केलेली घुसखोरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष रोखू शकले नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पंचायत समित्या, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप वरचढ झालेला दिसून येईल. 
..... 
त्रिमूर्तीमुळे ताकद वाढली 
सध्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे पनवेल तालुक्‍यातील दोन आणि उरणमध्ये एक सदस्य आहे. जिल्ह्यातील एकही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात नाही; मात्र या पक्षाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे रवीशेठ पाटील आणि उरणचे महेश बालदी या त्रिमूर्तीच्या आक्रमक राजकारणामुळे भाजप ग्रामीण स्थानिक भागात वरचढ होण्याची शक्‍यता ग्रामपंचायतींच्या निकालावरून दिसून येत आहे. 
---- 
जिल्हा परिषदेची आजची स्थिती 
भाजपा- 3 
राष्ट्रवादी- 12 
कॉंग्रेस- 3 
शेकाप- 23 
शिवसेना- 18 
एकूण- 59

BJPs performance in Raigad district elections is better than Mahavikas Aghadi

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs performance in Raigad district elections is better than Mahavikas Aghadi