BLOG: महासत्ता असल्याचा फाजील आत्मविश्वास अमेरिकेला नडला

अश्विनी कुलकर्णी
Wednesday, 29 April 2020

आज जागतिक महासत्ता असलेली अमेरिका करोना विषाणूपुढे सपशेल निष्प्रभ झालेली दिसत आहे. जवळपास 10 लाख रूग्ण आणि 50 हजार मृत्यू झाले आहेत. त्यापैकी एक तृतीयांश एकट्या न्युयॉर्क शहरात आहेत. हे असं का झालं?

आज जागतिक महासत्ता असलेली अमेरिका करोना विषाणूपुढे सपशेल निष्प्रभ झालेली दिसत आहे. जवळपास 10 लाख रूग्ण आणि 50 हजार मृत्यू झाले आहेत. त्यापैकी एक तृतीयांश एकट्या न्युयॉर्क शहरात आहेत. हे असं का झालं? गेली 6 वर्षे या देशात राहून इथलं जीवन जवळून पाहिल्यावर मला असं वाटतं की महासत्ता असल्याचा फाजील आत्मविश्वास अमेरिकेला नडला.

अमेरिका पूर्णपणे बेसावध होती. गुप्तचर यंत्रणांनी अनेक वर्षापूर्वी इशारा देऊनही प्रशासनाची काहीही तयारी नव्हती. चीनमध्ये करोनाने हाहाकार माजवला असतानाही अमेरिकेत शेअर बाजार तेजीत होते. अमेरिकेने अनेक युद्धं खेळली असली तरी प्रत्यक्ष अमेरिकन जनतेला युद्धजन्य परीस्थितीचा अनुभव नाही. 

सर्वप्रथम अमेरिकेत कर्फ्यू नावाची गोष्टच नाही. व्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करण्याऱ्या देशात बंधनं ठाऊकच नाहीत. त्यामुळे लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात खूप उशीर झाला. Stay home stay safeची सूचना आल्यावर लोकांना काय करावे कळेना. दुकानातले Toilet paper सगळ्यात आधी संपले!! दारूच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या. बंदुकांचा खप वाढला. भांडवलशाहीच्या अगतिकतेमुळे मॉलमध्ये सेल लागले. हॉस्पिटल रुग्णांनी भरुन गेली. अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेचं कटू सत्य चव्हाटय़ावर आलं. ज्या लोकांचा आरोग्यविमा नव्हता त्यांना अडचणी आल्या. न्यूयॉर्क मधे ब्रॉंक्स भागात अनेक आफ्रिकन वंशाचे गरीब लोक राहतात. करोनाचा मृत्यूदर याच भागात जास्त असावा हा योगायोग खचितच नाही. 

अर्थव्यवस्थेचं चक्र रूतून बसलं. अडीच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सरसकट सर्व करदात्यांना आर्थिक मदत वाटण्याचा समाजवादी विचार राबवायला लागला. हजारो भारतीय सुद्धा यात भरडले गेले. अनेकांचे व्हिसा संपले. ज्यांनी घरं घेतली होती त्यांचे हप्ते थकले. विद्यार्थ्यांचे पैसे संपले. पण अशातही भारतीय एकमेकांना धरून आहेत. बचतीची आपली सवय अशावेळी उपयोगी पडते. 

आता अमेरिकेतील नागरिक बऱ्यापैकी सावरलेत. मोठ्या प्रमाणावर चाचण्या चालू आहे. हळूहळू दुकानं परत उघडायला लागली आहेत. लोक मास्क लावून पार्कमध्ये फिरत आहेत. करोनाचा संकट अजूनही टळलेलं नाही. अमेरिका यातून नक्कीच बाहेर पडेल पण त्यासाठी फार मोठी किंमत चुकवून...!!

(लेखिका मुळ भारतीय आहेत. गेली काही वर्षे अमेरिकेतील मिशीगन शहरात वास्तव्यास आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blog written by ashwini kulkarni on going situation in america