BMC budget | आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; नवे कर लागू करण्याची शक्‍यता कमी

समीर सुर्वे
Wednesday, 3 February 2021

मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. 3) आयुक्त इक्‍बालसिंह चहल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सुपूर्द करणार आहेत.

मुंबई  : मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. 3) आयुक्त इक्‍बालसिंह चहल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सुपूर्द करणार आहेत. यात नवे कर लागू करण्याची शक्‍यता कमी आहे; मात्र पालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या काही सुविधांसाठी शुल्क आकारले जाण्याची शक्‍यता आहे. याशिवाय कोव्हिडच्या सावटाखाली अर्थसंकल्प असल्याने प्रशासकीय खर्चात बचत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

पालिकेचा 2020-21 या वर्षाचा अर्थसंकल्प 33 हजार 441 कोटी रुपयांचा होता; मात्र कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर या अर्थसंकल्पात जून महिन्यात कपात करण्यात आली होती. यंदाचा अर्थसंकल्प 34 हजार कोटींहून अधिक रकमेचा असण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा नवे कर लावले जाणार नाहीत. याशिवाय विकासकामांसाठीही भरीव तरतूद केली जाणार आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपनगरात दोन ते तीन नवी रुग्णालये सुरू करण्याची वा सध्या अस्तित्वातील रुग्णालयांचा विस्तार करण्याची घोषणा होऊ शकते. शाळांच्या डिजिटायझेशनवर भर दिला जाईल. पाणी, रस्त्यांसाठी महत्त्वाचे प्रकल्प असतील. याशिवाय तुंबणाऱ्या मुंबईची समस्या दूर करण्यासाठी योजनांची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. 

उपकर भरावे लागणार 
500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द झालेला असला; तरी त्यात समाविष्ठ असलेले इतर उपकर आणि शुल्क भरावे लागणार आहेत. त्याबाबत कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्‍यता नाही. 

जुने प्रकल्पांव भर 
- नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतचा सागरी किनारी मार्ग त्याच बरोबर गोरेगाव मुलूंड विक्रोळी जोड रस्त्यासाठी भरीव तरतूदीची शक्‍यता 
- मिठी, दहिसर, वालभाट आणि ओशिवरा नदीचे शुध्दीकरणही युध्दीपातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न. 
- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ब्रिमस्ट्रोवॅड अंतर्गत पुर्व उपनगरातील माहुल आणि पश्‍चिम उपनगरातील मोगारा या उच्च क्षमतेच्या पंपिंगस्टेशनसाठी भरिव तरतूद 
- देवनार येथे 600 मेट्रीक टन कचऱ्यापासून विज निर्मितीसाठी मोठी तरतूद 

 

नवे काय असेल 

  • - शाळांच्या डिजीटलायझेशन अंतर्गत डिजीटल बोर्ड तसेच इतर तरतूदी 
  • - सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करणे 
  • - कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन राडारोडा (डेब्रिज )प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा 
  • - पावसाळी पाण्याचा निचराकरण्यासाठी भुमिगत महाकाय टाक्‍या आणि मिनी पंपिंगस्टेशन उभारण्याची घोषणा 
  • - समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी सल्लागार नेमण्याची घोषणा.

----------------------------------------------- 
( संपादन - तुषार सोनवणे )

BMC budget Mumbai Municipal Corporations budget today Less likely to impose new taxes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC budget Mumbai Municipal Corporations budget today Less likely to impose new taxes