BMC रुग्णालयांना मिळणार संजिवनी; आरोग्य समितीने घेतला मोठा निर्णय

समीर सुर्वे
Thursday, 21 January 2021

कोविड काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जात आहेत. यात डॉक्‍टरांची कमतरता हा कळीचा मुद्दा आहे.

मुंबई  : कोविड काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जात आहेत. यात डॉक्‍टरांची कमतरता हा कळीचा मुद्दा आहे. आता 105 सहयोगी प्राध्यपकांच्या रिक्त जागांपैकी 100 जागा भरण्याचा निर्णय आज आरोग्य समितीत घेण्यात आला. याशिवाय कोव्हिड काळासाठी मिळालेल्या 700 श्‍वसन यंत्रणा (व्हेंटीलेटर) रुग्णालयांसाठी वापरता येणार आहेत. 

महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयात अध्यापनासह रुग्णसेवेसाठी सहयोगी प्राध्यापक महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सहयोगी प्राध्यापकांच्या तब्बल 105 जागा रिक्त आहेत. हीच स्थिती सर्व श्रेणीतील डॉक्‍टरांची आहे. त्यांच्या सुमारे 40 टक्के जागा रिक्त आहेत. आता सहयोगी प्राध्यापकांच्या 100 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सहयोगी प्राध्यपाकांचे वेतन दोन लाखाच्या आसपास असते, अशी माहिती आरोग्य समिती अध्यक्ष प्रविणा मोरजकर यांनी दिली. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या बैठकीत पालिकेच्या रुग्णालयातील अपुऱ्या श्‍वसन यंत्रणांचाही मुद्दा उपस्थित झाला होता. पालिका रुग्णालयात सुमारे 450 ते 500 श्‍वसन यंत्रणा आहेत. मात्र, प्रत्यक्षात दुपटीहून अधिक गरज आहे. कोव्हिड काळात पंतप्रधान देखभाल निधी अंतर्गत मिळालेले, तसेच महापालिकेने विकत घेतलेल्या श्‍वसन यंत्रणा आता पालिकेच्या रुग्णालयात वापरण्यात येणार आहेत. सध्या 700 श्‍वसन यंत्रणा वापरण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने या यंत्रणा पालिका रुग्णालयात आणल्या जाणार असल्याचे मोरजकर म्हणाल्या. 
कोव्हिड रुग्णांसाठी पालिकेचे तसेच खासगी रुग्णालयातील 1058 श्‍वसन यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यातील 490 श्‍वसन यंत्रणा रुग्णांसाठी वापरले जात आहेत. तर,566 यंत्रणा विनावापर पडून आहेत. 

In BMC hospitals Recruitment of 100 associate professors in mumbai marathi news

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In BMC hospitals Recruitment of 100 associate professors in mumbai marathi news