मुलूंड कोविड केंद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेला पालिकेची नोटीस

समीर सुर्वे
Sunday, 18 October 2020

मुलूंड येथील कोविड केंद्राची जबाबदार असणाऱ्या संस्थेला महानगर पालिकेने नोटीस पाठवली आहे. रिचर्ड ॲन्ड क्रुडास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या या कोविड केंद्राची जबादारी आश कॅन्सर ट्रस्ट ॲन्ड रिसर्च सेंटरला देण्यात आली आहे.

मुंबई: मुलूंड येथील कोविड केंद्राची जबाबदार असणाऱ्या संस्थेला महानगर पालिकेने नोटीस पाठवली आहे. रिचर्ड ॲन्ड क्रुडास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या या कोविड केंद्राची जबादारी आश कॅन्सर ट्रस्ट ॲन्ड रिसर्च सेंटरला देण्यात आली असून भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होत नसल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे.

महापालिकेच्या टी प्रभाग कार्यालयामार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या कोविड केंद्रात 2 हजार 644 रुग्णांवर उपचार झाले आहेत. त्यातील 187 रुग्णांना रुग्णालयात हलविण्यात आले. तर,11 जणांचा मृत्यू झाला आहे.  146 रुग्णांना वैद्यकीय सल्ला देऊन डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरीत 2299 रुग्णांपैकी 1550  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी 406 रुग्णांना 11 दिवसात तर उर्वरीत 1144 रुग्णांना 11 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आयसीआरच्या गाईडलाईननुसार 85 टक्के रुग्णांना 11 दिवसांच्या आता डिस्चार्ज देणे गरजेचे आहे. 

1 ऑक्टोबर पर्यंत 183 रुग्णांना डिस्चार्ज देणे गरजेचे होते. मात्र,तसे झालेले नाही असा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आले आहे.  ही नोटीस नसून संबंधित संस्थेला आरसीसमआरच्या मार्गदर्शन सुचना पाळण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत’,असे टी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले. आयसीएमआरच्या गाईडलाईन नुसार रुग्णात सलग तीन दिवस कोणतीही लक्षण नसल्यास ताप नसल्यासे घरी पाठवावे. तसेच त्याने सात दिवस गृहविलगीकरणात राहावे असा नियम आहे.  आम्ही आयसीएमआरच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करत असून सर्व रुग्णांना नियमाप्रमाणे डिस्चार्ज केले जात असल्याचं आशा कॅन्सर ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ.सतीश कामत यांनी सांगितले.

आयसीयूतील प्रत्येक रुग्ण दगावला

शहरात कोविड सेंटर उभारण्यावर पालिकेने अमाप खर्च उभारला आहे. मात्र, रुग्णांना काय सुविधा मिळतात. किती डॉक्टर उपस्थित असतात याचा लेखाजोखा ठेवला जात नाही. या कोविड सेंटरमध्ये 25 सप्टेंबरला आयसीयू सुरु झाला. पण, त्या आयसीयूमध्ये गेलेले सर्व रुग्ण दगावले आहेत. याबाबत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे, असे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

कोविड सेंटरमध्ये किती डॉक्टर उपस्थित असताना रुग्णांवर कोणते उपाय होतात. याकडे पालिका बघतही नाही. प्रत्येक रुग्णांमागे ठराविक रक्कम पालिका संस्थेला देत आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक रुग्णामागे 1 हजार रुपये पालिका खर्च करते. मात्र,ही संस्थेची धन होत आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BMC notice organization in charge of Mulund Covid 19 Center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC notice organization in charge of Mulund Covid 19 Center