मुंबई : पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढ्या संख्येने चालू करण्यात आले आहेत. 

मुंबई : महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढ्या संख्येने चालू करण्यात आले आहेत. प्रत्येक उदंचन केंद्रात तेथील आवश्यकतेनुसार सहा ते दहा एवढ्या संख्येने पंप असून, या प्रत्येक पंपाची क्षमता ही दर सेकंदाला तब्बल 6 हजार 600 लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे.

सर्व सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण 43 पंप असून त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता त्यापैकी 24 पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. वरील नुसार शहर भागातील हाजीअली पंपिंग स्टेशन येथील सहापैकी तीन पंप सध्या चालू करण्यात आले आहेत.

शहर भागातीलच वरळी गाव येथील क्लीव्ह लॅन्ड बंदर पंपिंग स्टेशन येथील सातपैकी चार पंप सध्या चालू करण्यात आले असून वरळी नाक्याजवळ असणाऱ्या लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशन येथील दहापैकी चार पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत.

शहर भागातील रे रोड परिसरात असणाऱ्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशन येथील सहापैकी चार पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. पश्चिम उपनगरातील सांताक्रुज परिसरात असणाऱ्या गजधरबंध पंपिंग येथील सहापैकी चार पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. तर जुहू परिसरातील इर्ला पंपिंग स्टेशन येथील आठपैकी पाच पंप पाण्याचा अधिक वेगाने उपसा व निचरा करण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Planning for Water Management

टॅग्स