
कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी पालिकेने आजवर 10 कोटी 99 लाख रुपयांचा खर्च केला आहे. मुंबईत आतापर्यंत 11,249 मृतदेह हाताळले गेले आहेत. मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन म्हणून पालिकेने प्रत्येकी 500 रुपये भत्ता सुरू केला आहे.
मुंबई : कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी पालिकेने आजवर 10 कोटी 99 लाख रुपयांचा खर्च केला आहे. मुंबईत आतापर्यंत 11,249 मृतदेह हाताळले गेले आहेत. मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन म्हणून पालिकेने प्रत्येकी 500 रुपये भत्ता सुरू केला आहे.
मार्च ते ऑगस्ट यादरम्यान मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कोरोना मृतदेह बंदिस्त करण्याचे जोखमीचे काम करताना पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती होती. जीव धोक्यात घालून हे काम केले जात होते, यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा कवचही पुरवण्यात आलेले नव्हते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना विमा कवच पुरवले. याशिवाय मृतदेह बंदिस्त करणारे पालिकेचे नियमित कर्मचारी, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना मृतदेह बंदिस्त करण्यासाठी 500 रुपये प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात आला. या कामात दोन व्यक्तींचा सहभाग होता. त्यांना एका मृतदेहामागे एक हजार रुपये दिले जातात.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
गेले नऊ महिने कोरोनाने दगावलेल्यांवर पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह व्यवस्थित करणे, त्याला आवरणात गुंडाळणे, मृतदेहावर माहितीचा बिल्ला बांधणे, मृतदेह शवागारात पोहोचवणे आदी कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. पालिकेने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला.
सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे भय प्रचंड होते. सुरक्षेची साधनेही कर्मचाऱ्यांना मिळत नव्हती. आरोग्य विभागाने विमा कवच तसेच प्रोत्साहन भत्ता देण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना भत्ते नियमित मिळत असल्याने कर्मचारीही सुरक्षेबाबत निश्चिंत झाले आहेत. कर्मचाऱ्यांना हे भत्ते यापुढेही सुरू राहिले पाहिजेत.
- प्रदीप नारकर,
चिटणीस म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई
BMC spends billions to handle corona bodies in mumbai
-------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )