संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल; कोरोना टेस्टनंतर दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं शनिवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयाद दाखल करण्या आलं. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या त्रासामुळे संजय दत्तची कोरोना टेस्टही कऱण्यात आली.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं शनिवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयाद दाखल करण्या आलं. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या त्रासामुळे संजय दत्तची कोरोना टेस्टही कऱण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संजय दत्तला लिलावती रुग्णालयातील नॉन कोव्हिड आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, संजय दत्तच्या आणखी काही टेस्ट करणं बाकी असून प्रकृती स्थिर आहे.

संजय दत्तने ट्विटरवरूनही याची माहिती दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पुढच्या एक दोन दिवसात घरी सोडतील. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वादासाठी आभार असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात संजय दत्त त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. त्याची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं दुबईमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या संजय दत्तने कुटुंबासोबतचे फोटो टाकून आठवणी शेअर केल्या आहेत. 

संजय दत्तचा पानिपत हा चित्रपट लॉकडाऊनच्या आधी प्रदर्शित झाला होता. सध्या तरी त्याचे अनेक चित्रपट लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. यामध्ये सडक २, शमशेरा, भुज, केजीएफ, पृथ्वीराज आणि तोरबाज या चित्रपटांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे चित्रिकरण थांबले असून पुन्हा कधी सुरु होणार याबाबत काही निश्चित नाही. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बॉलिवूड स्टार्सपर्यंतही पोहोचला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि अराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज अभिषेक बच्चनसुद्धा घरी परतला आहे. दरम्यान, अभिनेते अनुपम खेर यांच्याही कुटुंबातील काही सदस्यांना कोरोना झाला होता अशी माहिती समोर आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor sanjay dutt admitted in lilawati hospital