बॉलिवूड कलाकारांची इरफान खानला श्रद्धांजली

बॉलिवूड कलाकारांची इरफान खानला श्रद्धांजली

मुंबई : अभिनेता इरफान खान याच्या निधनाची बातमी समजल्यावर चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.. मालिका, बॉलिवूड आणि हॉलिवूड असा प्रवास करणारा चतुरस्त्र कलावंत हरपल्यामुळे चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कलाकारांची त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

कमालीचा अभिनेता, साधा माणूस
इरफान खान यांची पत्नी उत्तम लेखिका आहे. झी टीव्हीवरील ’बनेगी अपनी बात’ ही मालिका तिने लिहिली होती. या कौटुंबिक मालिकेत मला काम करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली.  त्यावेळी मी स्ट्रगल करणारा कलाकार  होतो. त्यांनी माझे नाव दिग्दर्शकाला सुचवले आणि मला संधी मिळाली. तेथे इरफान यांच्याशी माझी पहिली ओळख झाली. मी तीनेक भागांत त्यांच्यासह काम केले. त्यावेळी 27 किंवा 28 वर्षांचे असलेल्या इरफान यांनी या मालिकेत 55 वर्षांवरील व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. यावरून ते किती कमालीचे अभिनेता होते, हे लक्षात येते. आपल्या वयापेक्षा अधिक वयाची भूमिका साकारण्याचे खूप मोठे आव्हान त्यांनी लीलया पेलले होते. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या तरी पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांची व माझी भेट व्हायची. त्यावेळी आम्ही थोडा वेळ काही ना काही बोललो. मी लंडनला 'हाऊसफुल ४' चे चित्रीकरण करीत होतो. तेथे त्यांची व माझी भेट झाली. तेथे ते उपचार घेत होते आणि त्यावेळी आमची अचनक भेट झाली. त्यावेळी ते मला म्हणाले की, तू ’हाऊसफुल-५' काढणार आहेस का? मला कॉमेडी करायची आहे. मी तुझ्या चित्रपटात काम करणार आहे... मी हो म्हटले. ते एक चांगले कलाकार आणि चांगला माणूस होते. कोणत्याही विषयावर दिलखुलास गप्पा मारायचे. केवळ हिंदी नाही, तर हॉलीवूडचे चित्रपटही त्यांनी केले. त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता. अगदी साधा माणूस...  
- साजिद खान, दिग्दर्शक 


इरफानने ’ब्लॅकमेल' चित्रपटात माझ्यासाठी काम केले. अवघ्या दोन तासांत त्याने मला होकार दिला. मी त्याच्याबरोबर काम करायचे हे नक्की केले होते. चित्रपट पाहून मी त्याच्या अभिनय कौशल्याने प्रभावित झालो होतो. मी त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या ऑफिसात गेलो आणि माझ्या चित्रपटाची स्क्रिप्ट दिली.  त्याने लगेच होकार दिला. नंतर त्याची व माझी चांगली मैत्री झाली. तो अगदी सहजपणे काम करायचा. प्रत्येक सीनमध्ये काही तरी नावीन्य असायचे. त्याची व माझी चांगली केमिस्ट्री जुळली होती. फक्त 40 दिवसांमध्ये आम्ही चित्रीकरण संपवले. त्याला कॅन्सर झाल्याचे समजल्यावर मी त्याला वारंवार भेटलो. त्या भेटींतही आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. हिंदीत त्याने वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आणि हॉलीवूडच्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबरही काम केले. वेगळ्या धाटणीचा आणि अभिनयनिपुण कलाकार होता तो. त्याची अभिनयशैलीच वेगळी होती. तो भारतातील खूप मोठा कलाकार होता. 
- अभिनय देव, दिग्दर्शक

इरफानभाईसोबत मी पहिलाच चित्रपट ’मकबूल’ केला. तेव्हा आमची ओळख झाली. ’अंग्रेजी मिडीयम’ चित्रपटात काम करताना आमचं ट्युनिंग चांगलंच जुळलं होतं. आम्ही सेटवर, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप छान मित्र होतो. अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर आमच्या चर्चा व्हायच्या. इरफानभाईसमोर मी अभिनय करायचो, तेव्हा त्यांच्याकडून बेस्ट रिअॅक्शन्स मिळायच्या. त्यांनी मला अभिनयात फार मदत केली आणि खूप पाठबळ दिले. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांच्या अभिनयाची शैली जगात सगळ्यांपेक्षा वेगळी होती. सेटवर आम्ही एकत्र जेवायचो. सख्या भावासारखं आमचं नातं होतं. ’हिंदी मिडीयम’ चित्रपटातनंतर त्यांनी मला ’ब्लॅकमेल’ आणि ’करीब करीब सिंगल’ या दोन चित्रपटांच्या ऑफर्स दिल्या होत्या; पण तारखा नसल्याने ते चित्रपट करू शकलो नाही. आजारी असतानाही ते सर्वांना खूप हसवायचे. त्यांचं बोलणं ऐकून आमचे डोळे पाणावायचे.
- दीपक डोब्रियाल, अभिनेता  

इरफान खान यांच्यासोबत मी काम केले नाही, पण ते कमालीचे अभिनेते होते. खूप कमी कालावधीत त्यांनी यशोशिखर गाठले. नाटकापासून त्यांनी सुरुवात केली. त्यांची  स्वतःची अशी वेगळी अभिनयशैली होती. त्याची संवाद म्हणण्याची स्टाईल निराळी होती आणि ती लोकप्रियही झाली. ते ज्या पद्धतीने संवाद म्हणायचे, ते प्रत्येक अभिनेत्याला जमायचे नाही. कमी कालावधीत त्यानी स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले. मी स्वतः त्यांच्या अभिनयाची फॅन होतेच, शिवाय त्यांच्या शैलीचीही फॅन होते. आपल्याकडे असे कमी कलाकार आहेत, ज्यांनी भारताबाहेर स्वतःची ओळख निर्माण केली. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे इरफान खान.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री  

ट्विटरवरून श्रद्धांजली

लता मंगेशकर : गुणी अभिनेता इरफान खान यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.

अमिताभ बच्चन : इरफानच्या निधनाची दुःखद बातमी ऐकली. त्याच्यात एक अविश्वसनीय टॅलंट होते. एक चांगला सहकारी आणि सिनेमाच्या जगाला महत्त्वपूर्ण योगदान देणारा कलाकार आम्हाला खूप लवकर सोडून गेला.

आमिर खान : इरफानच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. तो एक उत्कृष्ट आणि टॅलंटेड अभिनेता होता. कामातून आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणल्याबद्दल इरफान तुझे  खूप आभार. 

शाहरूख खान : माझ्या मित्रा, प्रेरणादायी आणि आमच्या काळातील एक उत्कृष्ट अभिनेता. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. तुझी खूप आठवण येईल आणि तू आमच्या आयुष्याचा एक भाग होता हे नेहमीच लक्षात राहील.

सलमान खान : इरफानच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे, त्यांच्या चाहत्यांचे आणि सगळ्यात जास्त त्याच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती मिळो. इरफान तुझ्या आत्म्यास शांती लाभो. तू आमच्या मनात नेहमीच राहशील. 


आयुषमान खुराना : इरफानभाई, तुम्हाला जवळून जाणण्याची संधी नाही मिळाली. विचार केला होता, की तुमच्यासोबत थोडा वेळ घालावेन, एखादा चित्रपट करेन. कोणत्यातरी शूटिंग लोकेशनवर झाडाखाली बसून चहा पीत तुमच्याकडून आयुष्याचे ज्ञान घेतले असते... 

अनुभव सिन्हा : माझ्या मित्रा, तुला अजून खूप काम करायचं होतं. ते इतिहासात लिहिलं गेलं असत. आणखी थोडी ताकद लावली असतीस तर... पण मला माहितीये, तू  पूर्ण ताकद लावली असणार. ठीक आहे, जा आराम कर. दोन वर्षं खूप लढला आहेस तू. थकला असशील... 

शिल्पा शेट्टी : मी स्तब्ध आहे. इरफानच्या निधनाची बातमी ऐकून विश्वास बसत नाही आहे. आज मी एका चांगला मित्र आणि उत्कृष्ट सहकारी गमावला आहे. त्याचा अभिनय आणि काम नेहमीच स्मरणात राहील. 
 
प्रियांका चोपडा : तुमच्या अभिनयाची जादू खरी होती आणि प्रत्येक जण तिचा चाहता होता. तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली आहे. तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल.

परेश रावल : इरफान तुझ्या आत्म्यास शांती लाभो. तुझ्यासारखा व्यक्ती पुन्हा होणे शक्य नाही. 

सुजित सरकार : माझ्या प्रिय मित्रा इरफान, तू खूप लढलास. मला तुझा अभिमान वाटतो. आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल तुम्हीही खूप लढलात. सुतापा या लढाईत तू शक्य होईल, तितकं केलस. इरफान तुला सॅल्यूट. 

निमरत कौर : मला बोलायला सुचत नाही. इरफान आता आपल्यात नसल्यावर विश्वासच बसत नाही. आज भारताने एक महान अभिनेता गमावला आहे.

आवडते चित्रपट
एका मुलाखतीदरम्यान इरफान खानने त्याने अभिनय केलेले आवडते चित्रपट सांगितले होते. ’हासिल’, ’मकबूल’, ’लाईफ इन अ मेट्रो’, ’पानसिंग तोमर’, ’लंचबॉक्स’, ’तलवार’ आणि ’जज्बा’. हे सात चित्रपट इरफानला फार जवळचे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com