सिनेमातले अंडरवर्ल्ड

सिनेमातले अंडरवर्ल्ड

हिंदी चित्रपट उद्योगाला अंडरवर्ल्डचे वेगळेच आकर्षण. क्रौर्य, गुन्हेगारी, लैंगिकता आणि पैसा हा सारा मसाला ठासून भरलेल्या या दुनियेचे प्रतिबिंब अनेक चित्रपटांत पडलेले दिसते. त्यातील काही गाजलेल्या चित्रपटांवर एक नजर...

चित्रपट उद्योगाला मुंबईतील अधोविश्‍वाचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. याचे एक कारण म्हणजे, एखाद्या मसालेदार चित्रपटाला हवा असलेला सगळा मसाला त्यात ठासून भरलेला आहे. त्या काळोख्या दुनियेतील गुंडांमधील मैत्र, त्यांचे क्रौर्य, बदला, प्रेम, पैसा, हाणामाऱ्या, त्यांचे ऐयाश जीवन अशा गोष्टींनी हिंदी चित्रपट प्रभावीत झाले नसते तरच नवल. या विश्‍वाकडे ते कुतूहलाने, औत्सुक्‍याने आणि तेवढ्याच कौतुकाने पाहात होते. व्यवस्थेविरोधात, समाजाविरोधात लढणारे, परिस्थितीने गुन्हेगारीकडे वळलेले असे त्या विश्‍वातील गुंडांचे एक चित्र बॉलीवूडने नेहमीच मांडले. या माफियांना अनेकदा रॉबिनहूडच्या रुपात त्यांनी सादर केले.

सलीम-जावेद लिखित व यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिवार’ हा त्याच पठडीतला. १९७५ साली तो प्रदर्शित झाला. हा चित्रपट हाजी मस्तानवर बेतलेला होता म्हणतात. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन याने या चित्रपटात विजय ही प्रमुख भूमिका साकारली होती. विजय हा मजुरी करत पुढे स्मगलर होतो, तर भाऊ रवी (शशी कपूर) हा पोलिस होतो. त्यांचा एक भाऊ गुन्हेगारी जगात, तर दुसरा सत्य आणि कायद्याच्या बाजूने लढत असतो. दोन्ही भावांचे मार्ग वेगळे होऊन त्यांच्यात एक दिवार तयार होते. 

१९८८ साली फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेला ‘दयावान’ प्रदर्शित झाला. विनोद खन्ना (शक्ती) दयावानच्या मुख्य भूमिकेत, तर पोलिस अधिकारी रतन सिंगची भूमिका अमरिश पुरी यांनी साकारली होती. झोपडपट्टीत राहणारा दयावान हा गोरगरिबांचा मसिहा असतो. दुष्ट पोलिस अधिकारी रतन सिंगची तो दिवसाढवळ्या हत्या करून आपले अस्तित्व निर्माण करतो. ‘दयावान’ चित्रपट हा मुंबईतला दाक्षिणात्य डॉन वरदराजन मुदलीयार याच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जाते. 


१९९९ साली महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव प्रदर्शित झाला. त्यातील रघू ही प्रमुख भूमिका संजय दत्त याने साकारली आहे. शिवाजी साटम यांनी संजय दत्तच्या वडिलांची, तर रिमा लागू यांनी आईची भूमिका साकारली आहे. अनेक मराठी कलाकार या चित्रपटात आहेत. प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सामान्य मराठी कुटुंबातील एक तरुण गुन्हेगारी विश्‍वात कसा ओढला गेला, राजकारण्यांनी त्याचा कसा वापर करून घेतला, एन्काऊंटर होण्याच्या भीतीने धावत सुटलेला हा रघू शेवटी भीतीपोटी घरी येतो, शेवटी आईच त्याला गोळ्या घालते. हा चित्रपट छोटा राजन याच्यावर आधारित असल्याचे बोलले जाते. 


१९९८ साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’ प्रदर्शित झाला. अंडरवर्ल्डच्या दुनियेवर अंत्यत थरारक असा हा चित्रपट तिकीटबारीवर तुफान चालला. अनुराग कश्‍यप आणि सौरभ शुक्‍ला यांची पटकथा असलेला हा चित्रपट रामूच्या कारकिर्दीतली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच, पण बॉलीवूडमधील एक कल्ट फिल्मदेखील ठरली. गॅंगवॉर, हत्या, एनकाऊंटरचे अतिशय थरारक चित्रण असलेल्या या चित्रपटातील गाणीदेखील खूप लोकप्रिय झाली. 

ही बातमी वाचा ः मोठा किस्सा झाला, पोलिसांना बिर्याणी पडली महाग..
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला. अंडरवर्ल्डचे जग एकाला संपवून दुसऱ्याला टोळीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी केलेले कारस्थान, नातेसंबंध, असे अनेक पदर या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. चित्रपटात मकबूलचे कॅरेक्‍टर अभिनेता इरफान खान याने साकारले असून टोळीचा प्रमुख अब्बाजीच्या भूमिकेत पंकज कपूर, निम्मी अब्बाजीच्या पत्नीची भूमिका तब्बू, तर काका या कॅरेक्‍टरच्या भूमिकेत पीयूष मिश्रा हे आहेत; तर पोलिस अधिकारी पंडितच्या भूमिकेत ओम पुरी व पुरोहितची भूमिका नासिरुद्दीन शहा यांनी साकारली आहे. 

महत्वाचे ः वाद व्हावेत बाद
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेवर आधारित असलेला ‘ब्लॅक फ्रायडे’ हा चित्रपट अनुराग कश्‍यप दिग्दर्शित २००७ साली आला. या चित्रपटात गुन्हेगारांची खरी नावे वापरली गेली होती. अनुरागने या चित्रपटात जास्तीत जास्त वास्तवता आणली होती. या चित्रपटात के. के. मेनन या अभिनेत्याने या चित्रपटात राकेश मारिया यांची भूमिका साकारली होती. पवन मल्होत्रा यांनी टायगर मेनन व इम्तीयाज अली यांनी याकुब मेनन याची, तर विजय मौर्या यांनी दाऊद इब्राहिम याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शनाआधी वादात सापडला. मात्र तरीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. वास्तवतेच्या अधिक जवळ जाणारा हा चित्रपट अंडरवर्ल्ड माफियापटातला एक जबरदस्त अनुभव देऊन जातो. याचबरोबर शुट आऊट ॲट वडाळा, शुट आऊट ॲट लोखंडवाला, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, गॅंगस्टर, कंपनी, डी-डे असे अनेक अंडरवर्ल्डवर आधारित बॉलीवूड चित्रपट लोकप्रिय ठरले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com