esakal | कंगना राणावतच्या विधानाशी आम्हीही असहमत: मुंबई उच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना राणावतच्या विधानाशी आम्हीही असहमत: मुंबई उच्च न्यायालय

अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या मुंबई आणि महाराष्ट्र बद्दल केलेल्या विधानाशी आम्हीही असहमत आहोत, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.

कंगना राणावतच्या विधानाशी आम्हीही असहमत: मुंबई उच्च न्यायालय

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या मुंबई आणि महाराष्ट्र बद्दल केलेल्या विधानाशी आम्हीही असहमत आहोत, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. मात्र तिच्या विधानावर  खासदार असूनही असे प्रत्युत्तर देणे योग्य आहे का, असा सवालही न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना केला.

कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्राच्याबाबत केलेल्या विधानांवर राऊत यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी वादग्रस्त शब्द वापरुन धमकावले असा आरोप कंगनाने याचिकेत केला आहे. राऊत यांच्या वतीने मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. कंगनाला धमकावले नाही आणि तिच्या घरातील बांधकामावर तक्रार ही केली नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्र पाकव्याप्त कश्मीर वाटतो असे विधान केले होते. त्यावर अप्रामाणिक अशा अर्थाने प्रतिक्रिया दिली, असा खुलासा केला आहे. 

यावर, न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आम्हीदेखील या विधानाशी सहमत नाही. आपण सारेच महाराष्ट्रीयन आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमानही आहे. पण राजकीय नेते असताना उत्तर देताना भान ठेवायला हवे. कोणी आपल्याला उकसवत असेल तर दुर्लक्ष करायला हवे होते, ही पध्दत असते का बोलण्याची, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

राऊत यांनी मुलाखतीमध्ये कायदा काय आहे (कानून क्या है) असा सवाल केला होता. यावर, तुम्ही खासदार आहात, तुम्हाला कायद्याचा आदर नाही का, असा प्रतिसवाल खंडपीठाने केला. यावर, भावनेच्या भरात ते असे म्हणाले असतील, मात्र त्यांनी धमकाविले नाही. महाराष्ट्र सुरक्षित नाही, या कंगनाच्या विधानावर ती प्रतिक्रिया होती, असा खुलासा त्यांच्या वकिलाने  केला. 

मुंबई महापालिकेच्या वतीने कारवाईचे समर्थन करण्यात आले. केवळ आरोप करून बेकायदेशीर बांधकामावर लक्ष हटविण्यात येत आहे, तिने कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल करावा, असा युक्तिवाद एड अनील साखरे यांनी केला. महापालिकेने आताच कारवाई का केली या आधी काम सुरु झाले तेव्हा का नाही केली, असे न्यायालयाने महापालिकेला विचारले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी  ५ ऑक्टोबरला होणार आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Bombay High Court hauled up ShivSena MP Sanjay Raut over remarks Kangana Ranaut