खड्ड्यांमुळे वसई-विरारकरांची हाडे खिळखिळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सुविधा पाण्यात; खडतर प्रवासाचे दुखणे कायम 

वसई ः वसई-विरार महापालिकेच्या परिसरात नव-नवीन योजना; तसेच मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात असल्या, तरी अनेक ठिकाणी पावसाने सुविधांवर पाणी फेरले आहे. रस्ते चिखलमय झाले असून नक्षीदार खड्ड्यांमधून नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. रस्त्याच्या कडेला खडी, माती पसरली असल्याने नागरिकांना वसई व नालासोपारा, विरार भागात चिखल तुडवत वाट शोधावी लागत आहे. वाहने चालवताना हाडे खिळखिळी होत आहेत. 

नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन, तुळिंज, आचोळे मार्ग, समेळपाडा, सोपारा गाव, पेल्हार, नवघर पूर्व, एव्हरशाईन, वसंतनगरी, फादरवाडी, विरार यासह अन्य परिसरात खड्डे झाले आहेत. सिग्नललादेखील खड्ड्यांनी घेरले आहे. औद्योगिक वसाहतीमध्येही परिस्थिती दयनीय आहे. यामुळे वसईच्या महामार्गावरील 30 हजारांहून अधिक लोकवस्ती असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अवजड वाहनांची खड्डे चुकवताना कसरत करावी लागते. गोल, चौकोनी, आडवे, उभे असणाऱ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. 

गटारातील सांडपाणी रस्त्यांवर 
गटारे नादुरुस्त असल्याने घाण सांडपाणी वाहून ते रस्त्यांवर येत आहे. त्यातूनच नागरिक चालत असल्याने त्यामुळे साथीचे आजार निर्माण होत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने उपाययोजना केलेली नाही. त्यातच मार्गावर खड्डे पडल्याने त्याचाही फटका बसत आहे. 

वसई-विरारमधील रस्ते दुरुस्त केले जात आहेत. ज्या भागात रस्त्यांची समस्या आहे, तेथे पाहणी केली जाईल. त्यानुसार कार्यवाही करू. सहायक आयुक्त आणि प्रभाग समितीच्या बांधकाम विभाग अभियंत्यांना याबाबत सूचना देण्यात येतील. 
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bones of Vasai-Virarkar are damaged due to the pits