लग्नात नाचला अन् थेट रुग्णालयात पोहोचला

SUNRAYS
SUNRAYS

मुंबई : अवघ्या २० वर्षांचा तरुण. भावाच्या लग्नात बेभान नाचला. नाचता नाचता हाडे दुखू लागली. मणक्‍याला दुखापत झाली. एवढी, की अखेर त्याच्या मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे सारे झाले ते केवळ त्याच्या रात्रपाळीमुळे. मुंबईतील तरुणाईच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते याचे हे एक उदाहरण आहे.

मुंबईतील पश्‍चिम उपनगरातील हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून एका कॉलसेंटरमध्ये काम करीत होता. येथे रोजच रात्रपाळी. त्याने सकाळ कधी पाहिलीच नाही या काळात. त्यामुळे कोवळ्या उन्हाशी संबंधच आला नाही. दिवसभर घरी झोपायचे आणि रात्री कामावर जायचे असा परिपाठ. परिणामी, त्याच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाला. हाडे कमकुवत झाली.
भावाच्या लग्नात नाचताना अचानक त्याची हाडे दुखू लागली. त्याला नीट उभेही राहता येईना. त्यामुळे तातडीने त्याला वर्सोव्यातील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीतून लक्षात आले, की त्याच्या मणक्‍याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्‍यात स्क्रू बसवून त्याला आधार देण्यात आला. अपघातात मणक्‍याला इजा झाल्यास अशाप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येते, परंतु या तरुणाचे प्रकरणच अजब होते.

रुग्णालयातील मणका शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी सांगितले, की हा तरुण सलग तीन वर्षे कोवळ्या उन्हाच्या संपर्कातच आला नव्हता. त्यामुळे त्याच्या शरीरात अत्यंत कमी प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व होते. त्यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली.

जीवनसत्त्वाचा अभाव वाढतोय
मुंबईतील तरुणांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव वाढतोय. या जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेता येतात, परंतु या वयातील विद्यार्थ्यांनी, तरुणांनी गोळ्यांऐवजी थेट कोवळ्या उन्हातूनच नैसर्गिकरीत्या ते मिळवणे अधिक योग्य आहे. हल्ली मुंबईत असे रुग्ण सातत्याने आढळत असल्याचे काही डॉक्‍टरांनी सांगितले.

नव्या पिढीची बैठी जीवनशैली, मोबाईलवरच खेळणे यामुळे मैदानी खेळ जवळपास बंदच झाले आहेत. शहरांत मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींमुळे सूर्याची कोवळी किरणे मुंबईकरांना मिळत नाहीत. अनेक जणांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमरतरता निर्माण होते.
- डॉ. विशाल पेशत्तीवार, शल्यचिकित्सक

ड जीवनसत्त्वाचे फायदे 

- रक्तदाब नियंत्रित राहतो.
- स्नायू बळकट होतात.
- मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
- शारीरिक कार्यक्षमता वाढते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com