Panvel : भाकरीच्या गावालाही आता वाढत्या महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panvel

भाकरीच्या गावालाही आता वाढत्या महागाईची झळ

पनवेल : इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या किमतीही वाढल्‍या आहेत. पनवेल तालुक्यात भाकरीचे गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या ‘तक्‍का’ गावातील भाकरी व्यवसायालाही महागाईच्या झळा बसल्‍या आहेत. भाकरीचे दर १ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय गावातील बचत गटांनी घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे गावातून भाकऱ्यांचा पुरवठा होणारे हॉटेल, ढाबे आणि खाणावळींमधील भाकरीचा दर दोन ते पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रात मोडणाऱ्या तक्का गाव परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात खापरीवरील भाकऱ्या बनवण्याचा व्यवसाय करतात. या भाकऱ्यांना तालुक्यातील तारांकित हॉटेल, ढाबे तसेच खाणावळींमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

आगरी-कोळी समाजाच्या लग्न समारंभाप्रसंगी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या हळदी समारंभात मांसाहारी जेवणातही तक्‍का गावातील भाकरीला मोठी मागणी असते. इतर दिवशी दोन ते तीन हजार भाकऱ्यांची मागणी पाच हजारांवर जात असल्याची माहिती ओम साई महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनंदा वाघीलकर यांनी दिली. मंडळामध्ये जवळपास ७० महिला सदस्या आहेत. त्‍यापैकी ४० महिला सकाळी व संध्याकाळी ऑर्डरनुसार भाकऱ्या बनवून १५ रुपये दराने त्‍यांची विक्री करतात. मात्र इंधन दरवाढीमुळे महिलांनी भाकरीचे दर १ रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता ही भाकरी १६ रुपये प्रतिनग विकली जाते.

दोन ते पाच रुपयांनी दर वाढणार

भाकरीमागे केवळ १ रुपया दर वाढवण्याचा निर्णय महिला मंडळाने घेतला असला तरी तक्का गावातून भाकऱ्यांचा पुरवठा केला जाणाऱ्या हॉटेल, ढाबे तसेच खाणावळीतील दर मात्र दोन ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. हे दर विभागनिहाय वाढण्याची शक्‍यता आहे.

एक किलो पिठात ८ ते १० भाकऱ्या

तांदळाच्या एक किलो पिठापासून मोठ्या आकाराच्या ८ ते १० भाकऱ्या तयार होतात. भाकरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुलीमधील सुकी लाकडे, पीठ तसेच चक्कीचे दर आणि थापून भाकरी बनवण्यासाठी लागणारी मेहनत यातून महिलांच्या हाती तुटपुंजी रक्‍कमच शिल्लक राहते.

loading image
go to top