खोपोली-पेण मार्गाच्या कामाला 'ब्रेक'; प्रवाशांना मनस्ताप; रस्ता खचल्याने प्रवास धोकादायक

मनोज कळमकर
Sunday, 6 September 2020

तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारा खोपोली-पेण राज्यमार्गाच्या नूतनीकरणाच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे.

खालापूर : तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारा खोपोली-पेण राज्यमार्गाच्या नूतनीकरणाच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. याचा परिणाम काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यामुळे प्रवास धोकादायक आणि वेळखाऊ झाला आहे. 

वाह मुंबईकर! गणेशोत्सवातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल 'या' परिषदेकडून कौतुक

औद्योगिक तालुका खालापूर आणि गणेशमूर्तीचे माहेरघर असलेला पेण तालुक्याला जोडणारा 30 किलोमीटरचा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जेएम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरकडे देण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सुमारे 200 कोटी खर्चून काँक्रीट रस्ता तयार होत आहे. त्यासाठी येथील शेकडो झाडेही तोडण्यात आली आहेत. या चौपदरीकरणात खालापूर हद्दीत 17 किलोमीटर, तर उर्वरित 13 किलोमीटरचा पेण हद्दीत येतो. 

'खाकी'ने दाखवली भूतदया; पोलिसानी दिले अशक्त पक्ष्याला जीवदान

लाॅकडाऊनपासून या चौपदरीकरणाची अनेक कामे खोळंबली आहेत. कामाच्या ऐन हंगामात मजुरांना कोरोनामुळे गावी पाठवण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे रस्त्याच्या कामांना गती मिळालेली नाही. खोपोली-पेण राज्यमार्गाचे चौपदरीकरणासाठी केलेली खोदाई आणि मातीचे ढिगारे मार्गावर अनेक ठिकाणी तशीच पडून आहेत. डोणवतनजीक तीव्र उतारावर रस्त्याची बाजूपट्टी दोन फूट खचली आहे. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचे फलकही लावले आहेत. प्रत्यक्षात मात्र काम बंद आहे. अर्धवट काम झालेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात घडत असतात. त्यामुळे धोक्याची सूचना देणारे सिग्नल बसवण्याची मागणीही प्रवाशांकडून होत आहे.

 

ठेकेदार काम सुरू असल्याचे फलक लावून गायब झाले आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल तेव्हा मिळेल; परंतु सद्यस्थितीत खड्डे बुजवणे आणि दुरुस्तीची कामे तातडीने व्हायला पाहिजेत.
- किरण चव्हाण,
वावोशी, खालापूर

 

मजुरांची कमतरता नसून, काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेऊ.
- नीलेश पाटील, अभियंता, जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break in skull-pen route work; Annoyance to passengers; Travel is dangerous due to road erosion