प्लास्टिक, मद्याच्या बाटल्यांनी गुदमरतोय तिवरांचा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

वसई ः पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक संस्था पुढे येत असतानाच सरकारदरबारी मात्र याकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र आहे. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि मद्याच्या बाटल्यांमध्ये खाडीकिनाऱ्यावरील तिवरांच्या झाडांचा श्‍वास गुदमरत असल्याचा प्रकार अर्नाळा येथील "मी जागृत बंदरपाडेकर' सामाजिक संस्थेने घेतलेल्या आढाव्यादरम्यान उघड झाला आहे.

खाडीचे रक्षण आणि पर्यावरण समतोल टिकून राहावा, यासाठी तिवरांची (खारफुटीची) झाडे काम करतात; मात्र या झाडांनाच आता प्रदूषणाचा विळखा घट्ट बसत आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिसरात असणाऱ्या मारंबळपाडा या ठिकाणी खाडी आहे. या खाडीकिनारील तिवरांच्या झाडांचा आडोसा शोधत काही आंबटशौकिन या ठिकाणी येतात. ते मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन, प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यादेखील तेथेच फेकून दिल्या जातात. कचराही टाकला जातो.

सायकलवरून खाडीकिनारा, समुद्रकिनारा; तसेच शहर आणि ग्रामीण भाग पिंजून काढण्यासाठी "मी जागृत बंदरपाडेकर'ची टीम काम करत असताना उपाध्यक्ष निनाद पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली. प्रदूषणाच्या विळख्यातून खाडी आणि तिवरांच्या झाडांची सुटका करण्यासाठी या संस्थेच्या सदस्यांनी रविवारी (ता.18) स्वच्छता मोहीम हाती घेतली. मोहिमेत 20 जणांनी सहभाग घेतला. 

पक्षांचा अधिवास धोक्‍यात 
मारंबळपाडा या ठिकाणी फ्लेमिंगोसह विविध प्रकारचे बगळे व विविध जातीचे पक्षी विदेशातून येत असतात. त्यामुळे हा परिसर पर्यटकांसह नागरिकांच्या आकर्षणाचा आणि आवडीचा आहे; मात्र पक्ष्यांचा अधिवास धोकादायक बनत असल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The breath of the mangroves is shaking with plastic, alcohol bottles in Virar