शेअर मार्केटमध्ये निर्देशांकाची विक्रमी आगेकूच, रुपया स्थिर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार 12.05 अंशांवर बंद झाला. पाच महिन्यांनंतर प्रथमच निफ्टी 12 हजार अंशांवर स्थिरावला.

केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या सपाट्यानंतर भांडवली बाजारातील तेजीला बळ मिळाले असून दोन्ही निर्देशांकांची विक्रमी आगेकूच गुरूवारी (ता.7) कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार 12.05 अंशांवर बंद झाला. पाच महिन्यांनंतर प्रथमच निफ्टी 12 हजार अंशांवर स्थिरावला.

केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून बुधवारी (ता.6) रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 25 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. त्याचे सकारात्मक परिणाम भांडवली बाजारावर दिसून आले. यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्राला चालना मिळणार आहे. गुंतवणूकदारांनी आजच्या सत्रात धातू, ऊर्जा, बॅंकिंग आदी क्षेत्रात जोरदार खरेदी केली. कॉर्पोरेट कंपन्यांची दमदार कामगिरी आणि परकीय गुंतवणुकीचा सातत्यपूर्ण ओघ यामुळे बाजारातील तेजीला बळ मिळाल्याचे शेअर दलालांनी सांगितले. आजच्या सत्रात सन फार्मा, इंड्‌सइंड बॅंक, रिलायन्स, आयटीसी, वेदांता, एशियन पेंट्‌स, एचडीएफसी आणि इन्फोसिस आदी शेअर तेजीसह बंद झाले. मात्र येस बॅंक, एचयूएल, ओएनजीसी, टाटा मोटर्स, ऍक्‍सिस बॅंक, एलअँडटी आणि एनटीपीसी या शेअरमध्ये घसरण झाली. दिर्घकाळापासून मंदीच्या गर्तेत फसलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला 25 हजार कोटींच्या मदतीची घोषणा करून सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे देशभरातील 1 हजार 600 रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळेल. तसेच चीनने अमेरिकेसोबतचा व्यापारी संघर्ष कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले.

 

रुपयाचे मूल्य 70.97 वर स्थिर :

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 70.97 वर स्थिर राहिले. सकाळी बाजार उघडताच रुपयामध्ये 13 पैशांचे अवमूल्यन झाले होते. तो 71.10 च्या पातळीपर्यंत घसरला होता, मात्र भांडवली बाजारातील तेजीने रुपयाला फायदा झाला. तो सावरला आणि 70.97 वर बंद झाला.

Webtitle : BSE and nifty news updates

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSE and nifty news updates