कर्जतमध्ये बीएसएनएलचे सर्व्हर डाऊन; पोस्ट ऑफिसचे आर्थिक व्यवहार ठप्प 

हेमंत देशमुख
Thursday, 29 October 2020

कर्जत तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून सातत्याने बीएएसएनएलच्या इंटरनेट सेवेत बिघाड होतो आहे. वारंवार बीएसएनएलची इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने त्याचा फटका बॅंकिंग आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

कर्जत ः तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून सातत्याने बीएएसएनएलच्या इंटरनेट सेवेत बिघाड होतो आहे. वारंवार बीएसएनएलची इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने त्याचा फटका बॅंकिंग आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बॅंका पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत; मात्र सरकारी बॅंका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने त्यांना खंडित इंटरनेट सेवेचा सर्वाधिक फटका बसत आहे.

 50 टक्के शिक्षकांना तात्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश, अध्यादेश गोंधळाचा असल्याचा मुख्याध्यापकांचा आरोप

परिणामी विशेष करून कर्जत पोस्टाचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारून दमछाक होत आहे. तसेच ज्येष्ठांना दरमहिन्याला व्याजाचे मिळणारे पैसेही मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.आर्थिक ठेव ठेवताना खासगी बॅंकांपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी पोस्ट कार्यालय, बॅंकांकडे पाहिले जाते. नागरिकांकडून तथा ठेवीदारांकडून त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते; मात्र या अशा इंटरनेटअभावी वारंवार खंडित होणारी सेवा पाहून तसेच स्वतःचेच हक्काचे पैसे मिळायला लागणारा विलंब पाहून खासगी बॅंका बऱ्या म्हणण्याची वेळ ठेवीदारांवर आली आहे. 

मुंबई पालिकेला 34 कोटींचा दंड, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्देश

पोस्ट मास्तर तसेच अन्य कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता इंटरनेट नाही, सर्व्हर डाऊन आम्ही तरी काय करणार, अशी हतबलता दाखवत असमर्थता व्यक्त करतात. 

 

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळालेले लाखो रुपये याच पोस्टात ठेवून त्यापासून दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर ते आपली उपजीविका भागवतात; मात्र इंटरनेटअभावी तसेच सर्व्हर डाऊनमुळे पोस्टात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आम्हाला पैसे मिळत नाहीत. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे . 
- संदीप पाटील, कर्जत 

इंटरनेटअभावी सर्व्हर डाऊन होत आहे, यामुळे नागरिकांची जी गैरसोय होत आहे, त्याची बीएसएनएल आणि पोस्ट कार्यालयानेही त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी. 
- रमण गांगल, कर्जत 
 

 

BSNL server down in Karjat post work stopped

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL server down in Karjat  post work stopped