ग्राहकांना आकर्षित करण्यास बिल्डर सज्ज, स्टँप ड्युटीसह GST माफ, गृहविमा-फर्निचरही देणार
मुंबई: गेले एक दोन वर्षे वाढ खुंटलेल्या बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारने संजीवनी दिल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रौनक ग्रूपने तर ग्राहकांवरील मुद्रांक शुल्काबरोबरच जीएसटीचा भार देखील उचलण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे सरकारच्या निर्णयांमुळे ग्राहकही घरखरेदीकडे वळू लागल्याने बिल्डरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
इतके दिवस व्यावसायिक मागत असलेल्या सवलती सरकारने दिल्याने येता सणांचा हंगाम चांगला जाईल याची खात्री बिल्डरना वाटू लागली आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बिल्डर नव्या प्रोजेक्टची घोषणा करतील अशी चिन्हे आहेत. मात्र सरकार आणि बिल्डरने ग्राहकांना सवलती दिल्यानंतर आता बँकांनीदेखील गृहकर्जावरील व्याजदर कमी करावेत, अशी अपेक्षा असल्याचे नरेडकोचे महाराष्ट्र अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सकाळला सांगितले.
बांदेलकर हे रौनक ग्रूप चे एमडी असून त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये झिरो स्टँप ड्युटी, झिरो जीएसटी तसेच विनामूल्य फर्निचर आदी सवलती देऊ केल्या आहेत. सरकारच्या सवलतींमुळे आता ग्राहकांचे चौकशीचे कॉल आणि प्रत्यक्ष बुकिंग देखील सुरू झाली आहेत. आता बँकांनीही आपला वाटा उचलला पाहिजे, गृहकर्जांकडे बँका फार काटेकोरपणे पाहतात. तसे न करता त्यांनी व्याजदर आणखी कमी केले तर विचारणा करणारे ग्राहक प्रत्यक्ष घरखरेदी करतील, अशी खात्रीही बांदेलकर यांनी व्यक्त केली.
सध्या राज्य सरकारने दिलेल्या सवलतींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ग्राहक घरांच्या खरेदीसंदर्भात चौकशी करत आहेत, त्यातून प्रत्यक्ष घरखरेदीचे प्रमाणही वाढले आहे. सरकारच्या सवलतींना बिल्डर मंडळींनीही तसाच प्रतिसाद देऊन आता जवळपास शून्य मुद्रांक शुल्काची सवलत दिली आहे. सर्वच प्रकल्प राबविणारे बिल्डर अशाच वेगवेगळ्या सवलती देत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे घरांच्या वाढत्या किंमतींमुळे अनेक तरुण नोकरदारांचा कल भाड्याच्या घरांकडे वळला होता. आता त्या मंडळींनाही स्वमालकीच्या घराचे महत्व कळले असून त्यांनीही घरखरेदीसाठी चर्चा सुरु केली आहे, असे नरेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी म्हणाले.
पितृपक्ष संपून दसरा-दिवाळीचा हंगाम सुरु झाला की बिल्डर पाच प्रकारच्या सवलती जाहीर करतील, असे झनाडू रिअॅल्टी या रिअल इस्टेट कन्सलटंट फर्मचे संचालक प्रीतम बिश्त यांनी सकाळला सांगितले. शून्य स्टँपड्युटी, सोन्याची नाणी, निःशुल्क इंटिरिअर आणि फर्निचर, विनामूल्य नोंदणी आणि गृहविमा अशा सवलती दिल्या जातील. अनेक बिल्डर ग्राहकांचा पाच वर्षांचा गृहविम्याचा हप्ता भरणार असून नुकतेच आम्ही संभाव्य ग्राहकांचे त्याबाबत प्रबोधनही केल्याचेही ते म्हणाले. काही बिल्डरनी जानेवारीएवजी नोव्हेंबरमध्येच नवे प्रकल्प सुरु करण्याचे ठरविले आहे. येत्या दोन महिन्यांत ग्राहकांचा उत्साह वाढेल, नवे प्रकल्पही येतील आणि सवलतीही वाढतील. सरकारने करसवलत दिली असली तरी आता वाढीव मागणीमुळे सरकारचेही फार नुकसान होणार नाही, असेही ते म्हणाले.
घरविक्रीत प्रथम घराची जागा-बांधकाम-बिल्डरचे नाव आदी बाबी पाहिल्या जातात. त्यानंतर किंमत आणि सर्वात शेवटी सवलतींचा विचार केला जातो. त्यातही घरांशी थेट संबंधित अशा करसवलत, निःशुल्क इंटिरिअर आणि फर्निचर अशा सोयी लोकांना पटकन भावतात. कारण त्यामुळे घराच्या मूल्यावर परिणाम होतो. तसेच लोकांना सोन्याची आवड असल्याने सोन्याची नाणीही आकर्षित करतात. घरासोबत विनामूल्य मोटारसायकलची भेट काही बिल्डर देतात, पण ती फार चालत नाही. अनेक बिल्डर यंदाही पाच, दहा, शंभर ग्रामची सोन्याची नाणी देतील, असेही ते म्हणाले.
--------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Builder ready attract customers provide stamp duty GST waiver home insurance furniture
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.