
दिव्यात भूसंपादनाच्या सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी पिटाळून लावले.
दिवा : केंद्र सरकारच्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जागेचा सर्व्हे आज दिव्यातील शेतकऱ्यांनी थांबविला. ठाणे, पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. दरम्यान दिव्यात भूसंपादनाच्या सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी पिटाळून लावले. दिवा-डोंबिवली दरम्यानच्या बेतवडे व म्हातार्डी गावात गुरुवारी (ता. १३) हा प्रकार घडला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेपर्यंत बुलेट ट्रेनचे काम होऊ देणार नाही, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
ही बातमी वाचा ः उल्हासनगरच्या महिलेचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
ठाण्यातून बुलेट ट्रेन जात असल्याने भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत. बेतवडे गावातील सुमारे २० ते २५ गुंठे; तर म्हातार्डी गावातील २५ ते ३० एकर जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. तेथील बहुतांश जमिनीवर शेती होत असून त्यावर शेकडो कुटुंबांचे पोट अवलंबून आहे. त्यामुळे आम्हाला योग्य मोबदला द्या, त्यानंतरच जमिनी घ्या अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सातबारावरील बोगस नावे हटवणार
म्हातार्डी व बेतवडे या गावातील भूसंपादनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रांत अधिकारी अविनाश शिंदे यांनी सातबारावरील बोगस नावे हटविण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच सावकारांनी लाटलेल्या जमिनींबाबत अधिकृत हरकती नोंदवा, असे प्रांत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
मोबदला सावकारांच्या घशात
काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विविध कारणांसाठी सावकाराकडे गहाण ठेवल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शेतकरी व सावकार यांची एकत्रित बैठक घेतल्यानंतर जमिनीचा मोबदला दिला जाईल, असे ठरले होते. प्रत्यक्षात सर्वेक्षण न करता सावकारांना पैसे देण्यात आले; पण वर्षानुवर्षे जे शेतकरी या जमिनी कसत आहेत, त्यांना मात्र एक छदामही मिळालेला नाही, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ जयदास पाटील यांनी दिली.