खालापूरनजीक बस गटारात कलंडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

चाळीस प्रवासी बचावलेच; कोणीही जखमी नाही 

खालापूर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जवळपास चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी निमआराम बस दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत पावसाळी गटारात कलंडल्याची घटना खालापूर हद्दीत चौक फाटा येथे घडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

शनिवारी (ता. 24) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची निमआराम बस (क्र. एमएच-23-बीएल-3323) सकाळी अकराच्या सुमारास खालापूर हद्दीतून जात असताना चौक गावानजीक एक दुचाकीस्वार चुकीच्या विरुद्ध बाजूने आल्यानंतर बसचालकाने दुचाकीला होणारी धडक टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळी बसचे चाक रस्त्यालगतच्या पावसाळी गटारात गेल्यामुळे बस एका बाजूला कलंडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. प्रवाशांना उतरण्याच्या बाजूकडील दरवाजा बस कलंडल्याने बंद झाल्याने बसवाहक, चालक व स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत चालक बाजूकडील आपत्कालीन दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढले.

कलंडलेली बस लोखंडी रोप लावून कंटेनरच्या मदतीने तात्काळ बाहेर काढून ही बस सुस्थितीत असल्याने प्रवाशांना त्याच बसमध्ये बसवून ती मुंबईकडे रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus locked in a gutter near Khalapur