हृदयद्रावक! कर्करुग्णाच्या उपचारांना कोरोनाचा फटका...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 April 2020

डॉक्‍टरांअभावी शस्त्रक्रियेला विलंब होत असल्याने कुटुंबीयांना चिंता 

चेंबूर : कोरोनाग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना सध्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाही तातडीने उपचार मिळणे अवघड झाले आहे. चेंबूरचे रहिवासी असलेल्या 48 वर्षांच्या एन. शेखर यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. महिनाभरापासून त्यांना कर्करोगाने ग्रासले आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांची धडपड सुरू आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील मुकुंद नगरातील बालाजी चाळीत एन. शेखर राहतात. त्यांना 12 मार्चपासून जेवताना त्रास होत होता. दातांच्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पत्नी अलुमल शेखर त्यांना टाटा रुग्णालयात घेऊन गेली. त्यांना तोंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. टाटा रुग्णालयात बायोस्पी आणि सिटीस्कॅननंतर दोन दिवसांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. त्याकरिता त्यांना 15 मार्च रोजी बोलावण्यात आले. मात्र, लॉकडॉऊनमुळे 15 दिवसांनंतर येण्यास सांगण्यात आले. 15 दिवसांनीही त्यांच्यावर उपचार झाले नाही. "कोरोनामुळे डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जाऊन डॉक्‍टरांना दाखवून शस्त्रक्रिया करून घ्या' असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, तिथे गेल्यावरही त्यांना, जखम वाढली असल्याने शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला देण्यात आला. नाईलाजाने शेखर पुन्हा 9 एप्रिलला टाटा रुग्णालयात गेले. तेव्हा त्यांना रुग्णालयाचाच एक भाग असलेल्या "गोल्डन टाटा"मध्ये पाठविण्यात आले असता "15 दिवसांनी का आलात?' असा उलट सवाल आम्हाला करण्यात आल्याचा आरोप शेखर यांनी केला. कोरोनामुळे शस्त्रक्रियेसाठी डॉक्‍टर उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना फक्त औषधे लिहून देण्यात आली. एक आठवड्यातून एक गोळी घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने दुखणे कमी झाले असले तरी शस्त्रक्रिया कधी होणार, असा प्रश्‍न शेखर आणि त्यांच्या पत्नीला पडला आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

रुग्णाकडे दुर्लक्ष करू नका! 
लॉकडाऊनमध्येही टाटा रुग्णालयात जाऊन डॉक्‍टरांना भेटण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागली आहे. डॉक्‍टरांनी औषधे लिहून दिली आहेत. सध्या दुखणे कमी आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना आहे. मात्र, गंभीर आजारी असलेल्या इतर रुग्णाकडे दुर्लक्ष करू नका, अशी विनंती एन. शेखर यांच्या पत्नीने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cancer patient affected due to corona and lockdown