AIIMS चा अहवाल नाकारण्याचा दबाव CBIवर येईल, काँग्रेसचा आरोप

कृष्णा जोशी
Friday, 9 October 2020

आता सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा रिपोर्ट नाकारावा, असा दबाव सीबीआयवर येण्याची शक्यता आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

मुंबईः  टीआरपी रॅकेट तसेच समाजमाध्यमांवर निर्माण झालेली बोगस अकाऊंट या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भाजपचे कारस्थान आहे. हे मॉडेल धोक्यात येणे त्यांना परवडणारे नाही  आणि म्हणूनच आता सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा रिपोर्ट नाकारावा, असा दबाव सीबीआयवर येण्याची शक्यता आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा हे लोकशाहीसमोरचं मोठं संकट आहे. त्याचमुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी मुंबई पोलिसांनी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. टीआरपी आणि समाजमाध्यमे हे भाजपचे मॉडेल धोक्यात आल्यामुळेच जे. पी. नड्डा आणि प्रकाश जावडेकर यांची धावपळ सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

हेही वाचाः  शोभा देशपांडेंच्या आंदोलनावर मनसे आक्रमक, संदीप देशपांडेंकडून  दुकानादाराला चोप

टीआरपी रॅकेटच्या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करण्याचा  प्रयत्न तर झालाच पण इतर माध्यमांवर अन्याय करून हजारो कोटींचा महसुलही हडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र एखाद्या मोठ्या षडयंत्रासाठी या रॅकेटचा कसा उपयोग करता येतो हा राजकीय कोन देखील सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या निमित्ताने समोर आला. या प्रकरणात काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी जे केलं त्यातून जनभावना आणि राजकारणाची दिशा तयार करण्यात आली. आम्ही सांगतो तेच सत्य आहे आणि तेच लोकांना पाहायचे आहे, असे भासविण्यात आले. त्यामुळे इतर वाहिन्याही त्यांच्यामागे आल्या. त्याआधारे राजकीय डावपेच खेळले गेले. त्यासाठी समाजमाध्यमांवर बोगस अकाऊंट करणे, वेगवेगळे चॅनल चालवणे हे प्रकार झाले, असेही सावंत यांनी दाखवून दिले.  

अधिक वाचाः  डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

 

या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. या बोगस चॅनलच्या आणि मॉडेलचा उपयोग भाजपच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी झाला. त्यामुळे ते मॉडेल संकटात येणे भाजपला परडवणार नाही. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासासाठी तीन तीन राष्ट्रीय तपाससंस्था कामाला लागल्या. ज्या सीबीआयने कामाचा ताण आहे असे सांगून दाभोलकर प्रकरणाचा तपास नाकारला होता त्यांनी सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी पटकन ताब्यात घेतले. म्हणजे त्यांच्यावर किती दबाव आहे हे दिसून येते. आता हे मॉडेल संकटात आल्याने सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा अहवाल नाकारावा असा दबाव सीबीआयवर येण्याची शक्यता आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

CBI will be pressured to reject AIIMS report Congress Sachin sawant alleges


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI will be pressured to reject AIIMS report Congress Sachin sawant alleges