लोकलमधील सीसी टीव्ही "वेटिंग'वर! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सर्व लोकलच्या छतांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केली; मात्र अद्याप एकाही लोकलवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. 

मुंबई : दगडफेक करणाऱ्यांवर, तसेच "फटका गॅंग'वर वचक बसण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व लोकलच्या छतांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केली; मात्र अद्याप एकाही लोकलवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. 

रुळांवर उभे राहून लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर बांबू किंवा लोखंडी रॉडचा फटका मारून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे काही विकृत मंडळी लोकलवर दगडफेक करतात. अशा घटनांमध्ये आजवर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावर काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. लोकलच्या गार्ड आणि मोटरमन केबीनवरही हे कॅमेरे बसवण्याची रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केली होती. 

फटका गॅंग पूर्वी रात्री कार्यरत असायची; मात्र आता दिवसाही असे प्रकार घडतात. मंगळवारी (ता. 24) या गॅंगच्या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले होते. कारवाई होत नसल्याने या गॅंगचे धाडस वाढल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. 

 

मोटरमनच्या केबिनबाहेर सीसी टीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. "फटका गॅंग', लोकलवर होणारी दगडफेक करणाऱ्यांना कॅमेऱ्यात कैद करणे व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- के. के. अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे (मुंबई विभाग) 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cctv for local are still on waiting