esakal | मध्य रेल्वे सेवा बाधित; कसारा घाटात रेल्वेरूळावर बिघाड
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वे सेवा बाधित; कसारा घाटात रेल्वेरूळावर बिघाड

मध्य रेल्वे सेवा बाधित; कसारा घाटात रेल्वेरूळावर बिघाड

sakal_logo
By
विराज भागवत

पावसाचे पाणी, दरडी आणि बिघाडामुळे काही मार्गांवरील सेवा बंद

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र होते. तशातच बुधवारी रात्री १० वाजल्यापासून कसाऱ्या घाटात रेल्वेट्रॅकवर बिघाड निर्माण झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली. रेल्वेरूळावरील बिघाडामुळे नाशिकहून मुंबई येणारी व जाणारी वाहतूक दीर्घ काळ खोळंबली. परिणामी, दोन्ही बाजुने रेल्वे वाहतूक ठप्प असून वाहतूक पूर्वपदावर येण्यास अनिश्चित काळापर्यंत वेळ लागु शकतो, असं सांगण्यात येत आहे. तशातच कसारा घाटात दरड कोसळल्याने आणि अंबरनाथपासून पुढे कर्जतच्या दिशेला रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे सेवा बाधित झाली आहे. (Central Railway Train Services Suspended due to Fault at Kasara Ghat Waterlogging)

अंबरनाथ ते लोणावळा दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आधी तांत्रिक बिघाड आणि त्यातच पावसामुळे संपूर्ण रेल्वेच्या मार्गात वेगवेगळ्या भागात रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रुळावर पावसाचं साचलेलं असल्याने पाणी ओसरल्या नंतरच ट्रेन सुरू केल्या जातील, असे सांगितलं जात आहे. २०१९ मध्ये ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावर साचलेल्या पाण्यात बंद पडली होती, त्याच ठिकाणी यंदाही पाणी साचलं आहे.

या रेल्वे मार्गाशेजारी उल्हास नदी आहे. नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी रुळपर्यंत आलं आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी खालावणार नाही, तोपर्यंत लोकल सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर दरम्यानदेखील रुळावर पाणी साचल्यामुळे त्या भागातील रेल्वे वाहतूक बंद आहे. टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा रेल्वे सेवा बंदच आहे.

loading image