
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
हेही वाचा - "एसीबी'च्या कारवायांमध्ये राज्यात 28 टक्क्यांची घट! लॉकडाऊनमुळे कारवाईचे प्रमाण घसरले
प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. दांगडे हे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे रहिवासी आहेत. त्यांनी मुंबई येथून बी.व्ही.एस.सी. अँड एच. ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी, उप जिल्हाधिकारी (रोहयो) धुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक म्हणून सेवा बजावली आहे. 2011 साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर उपायुक्त (महसूल) कोकण विभाग आणि अध्यक्ष जात पडताळणी समिती म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे.
हेही वाचा - BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती
आता ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाले आहेत. प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, 1 ऑगस्ट 2002 रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते.
As the CEO of Thane Zilla Parishad dr dangade
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )