२३ जानेवारीला लोकार्पण होणारा बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कसा असेल, जाणून घ्या

दिनेश चिलप मराठे
Wednesday, 20 January 2021

बाळासाहेब यांच्या जयंती दिनी हा पुतळ्याचे अनावरण होणार असल्यानं शिवसैनिकांसह सर्व मराठी जनांच्या स्वाभिमानाचे एक प्रतिक सर्वाना पाहायला मिळणार आहे.

मुंबईः महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेल्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 फुट उंच पुतळयाचे कुलाब्यात  23 जानेवारीला लोकार्पण होणार आहे.  बाळासाहेब यांच्या जयंती दिनी हा पुतळ्याचे अनावरण होणार असल्यानं शिवसैनिकांसह सर्व मराठी जनांच्या स्वाभिमानाचे एक प्रतिक सर्वाना पाहायला मिळणार आहे.

दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.

19 जून 1968 साली बाळा साहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारी शिवसेना संघटना स्थापन केली. त्यांच्या शिवतीर्था दादर - शिवाजी पार्क मैदानावरील लाखोंच्या जनसागराला संबोधन करणाऱ्या सभा मुंबईकरांसह देशाने पाहिलेल्या आहेत. व्यासपीठावरुन समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेताना त्यांचे शिवतीर्थावर 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो...' अशी साद घालताच होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि वाजविल्या जाणाऱ्या शिट्टया, गगनभेदी घोषणा आजही लोकांच्या नजरे समोरून तरळत जातात.

मुंबईत बाळासहेबांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उभारणीस मुहूर्त काही सापडत नव्हता आणि अखेर यंदाच्या वर्षी 23 जानेवारी 2021 ला मुहूर्त ठरला आहे. गेली चार वर्षे या पुतळ्याच्या उभारणीचे कामप्रगती पथावर होते. गेल्यावर्षी या पुतळ्याचे निर्मितीचे काम पूर्ण झाले होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई महानगर महापालिकेनं जी जागा निश्चित केली होती तिला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे कुलाबा परिसरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात जागा निश्चित करुन सर्व सोपस्कार पूर्ण करुनी नवीन परवानग्या घेऊन काम पूर्णत्वास जाण्यात 23 जानेवारी 2020 हा दिवस निघून गेला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट देशापुढे उभे राहिले होते. त्याला तोंड देत वर्ष निघाले आणि अखेर यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला मुहूर्त सापडला आहे.

सुप्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी आपले पूर्ण कौशल्यपणाला लावत हा पुतळा घडविला आहे. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब येथे पुतळयाला घडविण्यात  आले आहे. आता हा पुतळा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात चौथऱ्यावर उभा करण्यात आला आहे.

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' असे मनाचा ठाव घेणारे दिवंगत बाळासाहेब सभेत भाषणाची सुरुवात करताना श्रोत्यांना साद घालणारी ओळ कोरण्यात आली आहे. या पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तु संग्रहालयाच्या दिशेने करण्यात आलेली आहे.

हेही वाचा- मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद

आपल्या भाषणाचा शेवट करताना बाळासाहेब ठाकरे जे शब्द उच्चारत असत ते शब्द म्हणजे 'जय हिंद जय महाराष्ट्र' हे सुद्धा या पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर करण्यात आलेले आहे.

23 जानेवारी या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली आहे. हे निमंत्रण विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कृष्णकुंजवर प्रत्यक्ष भेटत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं असल्याचं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Check here know about Balasaheb Thackeray statue features


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check here know about Balasaheb Thackeray statue features