NIA I छोटा शकील दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवायचा, NIA च्या तपासात माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

दाऊदसह त्याच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटद्वारे पैसा उभा केला आहे.

छोटा शकील दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवायचा, NIA च्या तपासात माहिती

आंतरराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहिम निकटवर्तीय मानला जाणारा छोटा शकील संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. छोटा शकीलने मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी कृत्ये करण्यासाठी पैसा पेरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी हवाला रॅकेटचा उपयोग करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती 'एनआयए'च्या तपासात समोर आली आहे.

दाऊदसह त्याच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटद्वारे पैसा उभा केला आहे. या पैशांचा उपयोग करून देशात महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणे, महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या हत्या करणे आणि या माध्यमातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट आखला होता. याविषयी गुप्त माहिती मिळल्यानेच मुंबईत छापे टाकण्यात आले होत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, 'एनआयए'ने मुंबईत एकाचवेळी २० ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये वांद्रे, नागपाडा, बोरिवली, गोरेगाव, परळ, सांताक्रूझ या ठिकाणांचा समावेश होता. दाऊदसाठी काम करणारे भाडोत्री नेमबाज, हवाला व्यवहार करणारे व्यावसायिक, स्फोटके तयार करणाऱ्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. याच छाप्यात छोटा शकीलकडून पैसा पेरण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. त्यानुसार आता मुंबईसह देशभरातील हवाला करणाऱ्यांवर एनआयए तसेच, तपास संस्था करडी नजर ठेवून आहेत.

दाऊद टोळीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती मिळाल्यानंतर 'एनआयए'ने फेब्रुवारीमध्ये दाऊद तसेच, त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला होता. यानंतर दाऊदची बहीण हसिना पारकरच्या घरावर 'एनआयए'ने छापा टाकला होता. पूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या हवाला व्यवहाराची माहिती या छाप्यांदरम्यान मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेदेखील (ईडी) या प्रकरणी तपास सुरू केला. 'एनआयए'ने या कारवाईचा दुसरा टप्पा गेल्या आठवड्यात सुरू केला होता.