'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

तुषार सोनवणे
Wednesday, 2 September 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या प्रशासनावर पुरेसा वचक नाही, मुख्यमंत्री फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यग्र आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या करतांनाही आपल्या फेवर मधल्या अधिकाऱ्यांना हव्या तशा विभागात बदल्या मिळत आहेत अशी टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या प्रशासनावर पुरेसा वचक नाही, मुख्यमंत्री फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यग्र आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या करतांनाही आपल्या फेवर मधल्या अधिकाऱ्यांना हव्या तशा विभागात बदल्या मिळत आहेत अशी टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे.

चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

कोरोना काळात प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणं अपेक्षित असताना महाविकासआघाडी सरकाने नागरिकांना ओरबाडण्याचं काम केलं असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पुण्यातील एका पत्रकाराचा रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे, असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे य़ांनी केला आहे. पत्रकाराचा साध्या रुग्णावाहिकेअभावी मृत्यू होत असेल तर पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचा उपयोग काय? कोव्हिड सेंटरच्या नावाला फक्त तंबू उभारले आहेत का असा संतप्त सवालही संदीप यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री राज्यात वास्तविक परिस्थितीचा अंदाज घरातून घेत आहे. त्यांना ते घरात बसून कसे कळणार? नागरिकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजू शकणार नाही. राज्यातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री सर्व सामान्यांना कधी दिलासा देणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

'या' नेत्याचा मनसेला रामराम; लढवली होती विधानसभा निवडणूक

दरम्यान भाजपनेही मुख्यमंत्र्यांच्या घरात बसून राज्याचा गाडा हाकण्यावर टीका केली आहे.राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले; पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ नाही. काल-परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "मातोश्री'च्या बाहेर यायला तयार नाहीत. क्वचित अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी गेले असतील; पण सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य चालवता येत नाही. यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister has no qualms about state administration;MNSs harsh criticism