अतिवृष्टीमुळे चिकू कुजून जमिनीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

बोर्डी परिसरात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; बागायतदार आर्थिक संकटात

बोर्डी ः बोर्डी परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिकू बागायतदारांची परिस्थिती बिकट केली आहे. चिकूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडावरील फळे कुजून पडली आहेत; तर झाडे मृतावस्थेत आली आहेत. सततच्या पावसामुळे चिकू फळबागा आणि  उत्पादनावर संकट कोसळले आहे. 

डहाणू तालुक्‍यात सुमारे पाच हजार हेक्‍टर जमिनीवर चिकू बागायती विकसित झालेली आहे. या माध्यमातून हजारो शेतमजुरांना रोजगार मिळत आहे; मात्र यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चिकू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्टमधील बहर भुईसपाट झाला आहे; तर सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये बाजारात विक्रीसाठी येण्यासारखी फळे बुरशीजन्य रोगाला बळी पडली आहेत.

महिनाभरापासून सतत पावसाने येथील जनजीवन विस्कळित करून टाकले आहे. शेतीची कामे वेळोवेळी बंद पडत असल्याने शेतमजुरांवरही उपासमारीची वेळी आली आहे, तर बाजारात चिकूची फळे विक्रीसाठी नियमित पाठवणे अशक्‍य होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

नुकसान संकटात लोटण्याची भीती
शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी, यासाठी आमदार पास्कल धनारे व खासदार राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे साकडे घालण्यात आले आहे; मात्र संबंधित खात्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. चिकू बागायतीमध्ये होणारे नुकसान भविष्यात डहाणू तालुक्‍याला संकटात लोटणार आहे, अशी भीती चिकू बागायतदार आणि विक्रेत्या प्रीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chiku rocks on the ground due to heavy rainfall in Bordi near Palghar