esakal | चीनच्या प्रवेशबंदीचा मुंबई पालिकेवर भर? भुयारी मार्गाचा खर्च वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

चीनच्या प्रवेशबंदीचा मुंबई पालिकेवर भर? भुयारी मार्गाचा खर्च वाढला

मुलूंड गोरेगाव जोड रस्त्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जाणाऱ्या भुयारी मार्गाचा खर्च तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच,आता दोन्ही बाजूचा भुयारी मार्ग तयार करण्याचे कंत्राट एकाच कंपनीला न देता दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला.

चीनच्या प्रवेशबंदीचा मुंबई पालिकेवर भर? भुयारी मार्गाचा खर्च वाढला

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: चिनी कंपन्यांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुलूंड गोरेगाव जोड रस्त्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जाणाऱ्या भुयारी मार्गाचा खर्च तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच,आता दोन्ही बाजूचा भुयारी मार्ग तयार करण्याचे कंत्राट एकाच कंपनीला न देता दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला असून त्यानुसार नव्या निवीदा प्रसिध्द केल्या आहेत.

भारत आणि चीनमध्ये ताणलेल्या संबंधामुळे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशांना भारतात व्यवसाय करायचा असल्याने नवी नियमावली केंद्र सरकारने तयार केली आहे. त्यानुसार संबंधित कंपनीची केंद्र सरकारकडे नोंदणी असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आता चिनी कंपन्यांना भारतात प्रकल्प मिळणे अवघड झाले आहे. टनेल खोदण्याची यंत्रणा चीनमध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेने स्वस्तात उपलब्ध आहे. त्यामुळे हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र,फक्त चिनी कंपन्यांना काम मिळण्याची शक्यता नसल्याने हा खर्च वाढलेला नसून पूर्वीचा अंदाजित खर्च हा दीड वर्षांपूर्वी निश्‍चित करण्यात आला होता. आता प्रत्यक्ष काम सुरु होईल त्या वेळच्या अंदाजित खर्चानुसार हे दर ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हा संपूर्ण रस्ता 7.48 किलोमीटरचा असून राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून 4.75 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. महानगर पालिका पूर्वी दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे कामाच्या निवीदा काढत होती. मात्र, दोन्ही बाजूच्या मार्गासाठी स्वतंत्र निवीदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी सुमारे 6 हजार 225 कोटी रुपये खर्चाचे अंदाज पत्रक तयार केले आहे. पूर्वी 4 हजार 770 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.आता यात 1 हजार 455 कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे.

म्हणून स्वतंत्र काम

एकाच कंपनीला काम दिल्यास त्यात अडचणी येऊ शकतात. ती कंपनी काम करु न शकल्यास किंवा ती कंपनी डबघाईला असल्यास त्याचा संपूर्ण प्रकल्पावर परिणाम होऊ शकतो. तसेच दोन वेगवेळ्या कंपन्यांना हे काम मिळाल्यास त्याच्यात स्पर्धा होऊन त्याचा कामावरही चांगला परिणाम होऊ शकतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

असे तयार होतील टनेल

मुलूंड हून गोरेगावच्या दिशेने जाणारे
लांबी - 4.71
खर्च - 3020 कोटी
रस्त्यांची रुंदी - 5.75 मिटर
व्यास - 13 मिटर
बांधकामाचा कालावधी - ५ वर्ष

 
गोरेगावहून मुलूंडच्या दिशेने येणारा

लांबी 4.68
खर्च - 3205
रस्त्याची रुंदी -5.75 मिटर
व्यास -13 मिटर
बांधकामाचा कालावधी - 5 वर्ष

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

China entry ban imposed on the Mumbai bmc The cost of the subway increased